'मेट्रो सुरक्षित आणि जागतिक दर्जाची'

'मेट्रो सुरक्षित आणि जागतिक दर्जाची'

प्रश्‍न (ब्रिगेडियर प्रसाद जोशी) - मेट्रो मार्गांचे काम पूर्ण कधी होईल? किती प्रवाशांना त्याचा फायदा होईल आणि प्रवासी भाडे काय असेल? 
दीक्षित -
पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या दोन्ही मार्गांचे काम 2020-21 पर्यंत पूर्ण होईल. तत्पूर्वी दोन्ही मार्गांवर चाचणी होईल. पिंपरी-स्वारगेट मार्गावर दररोज साडेतीन लाख, तर वनाज-रामवाडी मार्गावर दोन लाख प्रवासी याचा लाभ घेऊ शकतील. दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर 10 ते 50 रुपये भाडे मेट्रोचे असू शकते. 

प्रश्‍न (प्रशांत कनोजिया) - वनाज ते चांदणी चौकदरम्यान मेट्रोचे विस्तारीकरण करताना कोथरूड डेपो (भुसारी कॉलनी) हे स्थानक असेल का? 
- वनाजनंतर चांदणी चौकाचे स्थानक असेल. परंतु, त्या दरम्यान कोथरूड डेपोच्या स्थानकाची मागणी होत आहे. त्याबाबत प्रवासी आणि वाहतुकीचे सर्वेक्षण करण्यात येईल. त्यात आवश्‍यकता वाटल्यास निर्णय घेण्यात येईल. सर्वेक्षणावर याचा निर्णय अवलंबून असेल. 

प्रश्‍न (प्रसन्न काणे) - एलिव्हेटेड मेट्रोला रस्त्यावरील केबलचा अडथळा होणार नाही का? पौड रस्त्यावर कृष्णा हॉस्पिटलजवळ रस्ता रुंदीकरण करून वाहतुकीची कोंडी सोडविणार का? 
- मेट्रोचे काम सुरू आहे. ते पूर्ण होईल त्या प्रमाणात केबलबाबत महापालिकेच्या मदतीने उपाययोजना केल्या जातील. कामाच्या नियोजनात त्याचा विचार केला आहे. रस्ता रुंदीकरणाबाबतचा निर्णय महापालिका घेणार आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस मदत करीत आहेत. 

प्रश्‍न (संजय सोनवणे) - शिवाजीनगर-स्वारगेट भूमिगत मेट्रोचा नकाशा कोठे मिळेल? या मेट्रोमुळे रस्ता रुंदीकरण करावे लागेल का? 
- पिंपरी-स्वारगेट मार्गाचा संपूर्ण नकाशा महामेट्रोच्या कोरेगाव पार्क आणि घोले रस्ता कार्यालयात उपलब्ध आहे. तेथे तो मिळू शकेल. भूमिगत मेट्रोमुळे शहराच्या कोणत्याही भागात रस्ता रुंदीकरण करावे लागणार नाही. 

प्रश्‍न (शिल्पा पांडे) - मेट्रोची स्थानके नेमकी कोठे होणार? स्थानकावर प्रवाशांना सुविधा काय मिळणार? भूसंपादन करताना नुकसानभरपाई देण्याचे स्वरूप कसे असेल? 
- वनाज ते शिवाजीनगरदरम्यान एसएनडीटी, गरवारे कॉलेज आणि डेक्कन जिमखाना बसस्थानकाजवळ मेट्रोचे स्थानक असेल. स्थानकांची इमारत दोन मजली असून, त्याची रुंदी 21 मीटर आणि उंची 140 मीटर असेल. वाहनतळ, फूड कोर्ट आणि प्रवाशांना पूरक व्यवसायांना तेथे संधी दिली जाईल. रस्त्याच्या रुंदीच्या प्रमाणात एफएसआय वापरण्याचे धोरण राज्य सरकारने मंजूर केले आहे. वाहतुकीसाठीही विशेष धोरण (ट्रान्सिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट-टीओडी) मंजूर आहे. त्यानुसार एफएसआय वापरला जाईल. भूसंपादन करताना संबंधित जागामालकांना बाजारमूल्याच्या सुमारे अडीचपट रोख मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे स्थानकांच्या आवारात पुनर्वसनाचा प्रश्‍न उद्‌भवणार नाही. 

प्रश्‍न (हर्षल जोगळेकर) - मेट्रो स्थानक परिसरात स्वच्छता राखण्यासाठीचे उपाय काय? दैनंदिन तिकीट, पाससाठी स्कॅनर आणि वाहनतळ असेल का? 
- दोन्ही शहरांतील सर्व मेट्रो स्थानके जागतिक दर्जाची असतील. स्वच्छता, सुरक्षितता यासाठी काटेकोर उपाययोजना होतील. दैनंदिन तिकीट, पाससाठी प्रवाशांना मोबिलिटी कार्ड उपलब्ध होईल. त्याद्वारे कोठेही प्रवास करता येईल. प्रत्येक स्थानकाच्या आवारात शक्‍य तेथे वाहनतळ असेल. 

प्रश्‍न (अश्‍विनी खरात) - मेट्रोच्या 500 मीटर कॉरिडॉरमध्ये 4 एफएसआय वापरता येणार का? 
- मेट्रोच्या कॉरिडॉरमध्ये रस्त्याच्या रुंदीच्या प्रमाणात 4 एफएसआय वापरता येणार आहे. त्याचे धोरण राज्य सरकारनेच जाहीर केले आहे. 500 मीटर कॉरिडॉर निश्‍चित करण्याचे काम महापालिका राज्य सरकारच्या माध्यमातून करीत आहे. त्यानुसार लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे. 

प्रश्‍न (बी. पी. ताथवडकर) - बाणेर-औंधसाठी मेट्रो प्रकल्प आहे का? 
- बाणेर, औंधसाठी हिंजवडी-शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग उपलब्ध होईल. "पीएमआरडीए'च्या माध्यमातून त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. 

प्रश्‍न (शिवाजी सूर्यवंशी) - महिलांची सुरक्षितता, संभाव्य गुंडगिरी, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, सार्वजनिक स्वच्छता, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आदींसाठी मेट्रो स्थानकावर कोणत्या उपाययोजना असतील? 
- मेट्रोची स्थानके उभारताना सर्व बाबींचा विचार केला जाणार आहे. सर्वच स्थानके जागतिक दर्जाची असतील. त्यामुळे सुरक्षिततेबाबत नागरिकांनी निर्धास्त राहावे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण होणार नाही, तसेच स्वच्छताही राखली जाईल. सर्व समाजघटकांचा विचार करून कामकाज होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com