शुक्रवारनंतर सुरळीत पाणीपुरवठा 

शुक्रवारनंतर सुरळीत पाणीपुरवठा 

पिंपरी - पवना जलविद्युत केंद्रातील तांत्रिक दुरुस्तीचे काम शुक्रवारपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे त्याचा परिणाम धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर झाला आहे. जलसंपदा विभागातर्फे पुरेसे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरीदेखील शहरात गेले दोन दिवस विस्कळित झालेला पाणीपुरवठा आणखी दोन दिवस काही भागांत विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महापालिकेने बुधवारी केले. 

पवना धरणालगतच्या जलविद्युत केंद्रातून रोज दुपारनंतर बाराशे घनफूट प्रतिसेकंद (क्‍युसेक) वेगाने पाणी महापालिकेसाठी सोडण्यात येते. जलविद्युत केंद्रातील यंत्रणेत रविवारी सायंकाळी बिघाड झाल्याने, तेथून सोडण्यात येणारे पाणी बंद ठेवण्यात आले. त्याचा परिणाम होऊन रावेत बंधाऱ्याजवळील पाणी पातळी कमी झाली. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सोमवारी विस्कळित झाला. सोमवारी सायंकाळी सहापासून धरणाच्या दुसऱ्या गेटमधून चारशे क्‍युसेक पाणी सोडण्यात सुरवात झाली. तेथून त्यापेक्षा जादा पाणी सोडण्याची सोय नाही. पाण्याचे प्रमाण कमी असल्याने प्रवाहाचा वेग मंदावला. त्यामुळे मंगळवारीही रावेत बंधाऱ्याची पाणी पातळी गरजेपेक्षा कमी राहिली. मात्र, पाण्याचे प्रमाण वाढल्याने शक्‍य तेवढे पाणी पुरविण्यासाठी महापालिका यंत्रणा सातत्याने कार्यरत राहिली. 

महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, ""नदीतील पाणी पातळी कमी असल्यामुळे पंप बंद ठेवावे लागत होते. पातळी वाढली की काही पंप सुरू करीत होतो. जास्तीत जास्त पाणी पुरविण्याचा प्रयत्न केला, तरी साठवण टाकीतील पाणी पातळी कमी भरत होती. त्याचा परिणाम शहरातील उंच भागातील वस्तीत जाणवला. धरणातून सोमवारी रात्री सोडलेले चारशे क्‍युसेक पाणी सुमारे तीस तासांनी रावेत येथे पोचले. सकाळी अकरापासून वाढलेल्या पाणी पातळीत फारसा फरक पडला नाही. त्यामुळे सर्व 18 पंप सुरू ठेवले आहेत. नदीतील पाणी पातळीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. नागरिकांना पुरेसे पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहोत. जलविद्युत केंद्राची तांत्रिक दुरुस्ती होऊन पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू होईपर्यंत नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने व गरजेपुरताच करावा.'' 

रावेत बंधारा येथून महापालिका रोज 480 ते 490 दशलक्ष लिटर (एमएलडी), एमआयडीसी 100 एमएलडी आणि वाघोली पाणीपुरवठा योजनेसाठी 30 एमएलडी पाणी घेतले जाते. पाणीपातळी कमी झाल्याने, या सर्वच ठिकाणी पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. 

पवना जलविद्युत केंद्रातील स्पीड कंट्रोलिंग करणारा गव्हर्नर अनियंत्रित झाला. रविवारी ते लक्षात आल्यानंतर गव्हर्नर सर्व खोलून त्याचे सर्व्हिसिंगचे काम हाती घेतले. ते काम गुरुवारी सायंकाळी पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आहे. शुक्रवारी सायंकाळी ते काम पूर्ण होणे अपेक्षित असून, त्या वेळी तेथून धरणातील पाणी सोडण्यात येईल. 
- जे. वाय. बर्वे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पवना जलविद्युत केंद्र 

जलविद्युत केंद्रात दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने पवना धरणातून दुसऱ्या दरवाजातून चारशे घनफूट प्रतिसेकंद (क्‍युसेक) पाणी सोमवारी सायंकाळी सहापासून सोडण्यास सुरवात केली. महापालिकेला रोज 1200 क्‍युसेक वेगाने सहा तास पाणी सोडले जाते. सध्या सोडलेले 400 क्‍युसेक पाणी सलग 24 तास सोडत आहोत. महापालिकेला पुरेसे पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- नानासाहेब मठकरी, उपअभियंता, पवना धरण, जलसंपदा विभाग 

पवना नदीतील रावेत बंधारा येथील पाणी पातळी कमी झाल्याने जलउपसा करणारे काही पंप बंद करावे लागले. त्यामुळे गेले दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला. बुधवारी सकाळी अकराच्या सुमाराला नदीतील पाणी पातळी पुरेशी झाल्याने सर्व 18 पंप सुरू केले. प्रतितासाला दोन कोटी लिटर पाणी घेतो. तेवढे पाणी सध्या मिळत आहे. गेले दोन दिवस ताशी सव्वा ते दीड कोटी लिटर पाणी मिळत होते. मात्र, नदीतील पातळी सायंकाळी किती राहील, त्यावर उद्या सकाळचा पाणीपुरवठा अवलंबून राहील. 
- प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com