भूखंडांना बाजारमूल्याच्या अडीचपट मोबदला 

भूखंडांना बाजारमूल्याच्या अडीचपट मोबदला 

पुणे - मेट्रो प्रकल्प उभारताना स्थानके, वाहनतळ आदींसाठी राज्य सरकारने आरक्षित केलेल्या भूखंडांचे संपादन करताना मोबदला म्हणून संबंधित जागामालकाला बाजारमूल्याच्या तब्बल अडीचपट रोख रक्कम महामेट्रो देणार आहे. त्यामुळे मेट्रोसाठी भूसंपादन वेगाने होऊ शकते. दरम्यान, वनाज-रामवाडी मेट्रोमार्गाचे काम वेगाने सुरू झाले आहे. 

शहरात मोठे प्रकल्प उभारताना भूसंपादन करणे हा मुद्दा कळीचा ठरतो, ही बाब लक्षात घेऊन खासगी मिळकतीचे भूसंपादन वेगाने व्हावे, यासाठी केंद्र सरकारने एका खास कायद्यान्वये महामेट्रोला अधिकार दिले आहेत. त्यानुसार महामेट्रो संबंधित जागामालकाला तेथील भूखंडाचे जे बाजारमूल्य (रेडीरेकनर) असेल त्याच्या अडीचपट मोबदला रोखस्वरूपात देणार आहे. जागामालकाने संपर्क साधल्यास ही प्रक्रिया वेगाने पार पडेल, असेही महामेट्रोने स्पष्ट केले आहे. 

महामेट्रो शहरात वनाज-रामवाडी मार्गावर आयडियल कॉलनी, नळस्टॉप आणि एसएनडीटी महाविद्यालयाजवळ वाहनतळासाठी; तर पिंपरी-स्वारगेट मार्गावर बुधवार पेठ, मंडई परिसरात भूमिगत मेट्रो मार्गांवर स्थानकांच्या उभारणीसाठी काही खासगी जागांचे संपादन करणार आहे. त्यासाठी मोबदला देण्याचे सूत्र निश्‍चित झाले आहे, असे महामेट्रोच्या सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, वनाज-डेक्कन मार्गावर मेट्रोमार्गाचे खांब उभारण्यासाठी 15 ठिकाणी पाया खोदण्याचे काम पूर्ण झाले असून, चार खांब उभारण्यास सुरवात झाली आहे. जूनपर्यंत या मार्गावर सुमारे 125 खांब उभारले जातील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

सहा मार्चपासून वाहतुकीत बदल 
कर्वे रस्त्यावर एसएनडीटी महाविद्यालयापासून नळस्टॉप चौकापर्यंतच्या वाहतुकीत सहा मार्चपासून बदल होणार आहेत. या रस्त्यावर मध्य भागात मेट्रोचे खांब उभारण्यात येणार आहेत. सुमारे एक ते दीड वर्ष हा बदल राहू शकतो. काम पूर्ण होईल त्यानुसार वाहतूक पूर्ववत केली जाईल, असेही महामेट्रोने स्पष्ट केले. या बदलासाठी आवश्‍यक बसथांबे हलविणे, पदपथ अरुंद करणे, रस्त्याची रुंदी वाढविणे, वाहतूक नियमांची माहिती देणारे फलक उभारणे आदी कामे पूर्ण झाली आहेत, असेही सांगितले. 

200 बस पर्यायी मार्गाने 
पौड आणि कर्वे रस्त्यावरून येणारी वाहने एसएनडीटी महाविद्यालयाजवळून कालव्याच्या शेजारील रस्त्याने आठवले चौकात जातील. तेथून ती वाहने नळस्टॉप चौकातून नियोजितस्थळी पोचतील. दरम्यान, या रस्त्यावरून एसटी बसच्या सुमारे 270 फेऱ्या होतात. त्यातील 200 बस पर्यायी मार्गाने जातील, याचा आराखडा एसटी महामंडळ तयार करीत आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

माहिती केंद्र टिळक रस्त्यावर 
नागपूरच्या धर्तीवर पुण्यातही महामेट्रोतर्फे मेट्रो माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागा मिळावी, असा महामेट्रोचा प्रयत्न सुरू आहे. त्याअंतर्गत महामेट्रोने टिळक रस्त्यावर पूरम चौकात अभिनव महाविद्यालयाजवळील पीएमपीच्या भूखंडातील सुमारे पाच गुंठे जागा मिळावी, असा प्रस्ताव सादर केला आहे. या चौकाजवळ पीएमपीचे पूर्वी आगार होते. त्याचा सध्या वापर होत नसल्यामुळे हा भूखंड वापराविना पडून आहे. भाडेतत्त्वावर तो काही कालावधीसाठी मिळावा. तेथे पक्के बांधकाम करण्यात येणार नाही. पीएमपीला पाहिजे तेव्हा तो उपलब्ध करून दिला जाईल, असे महामेट्रोने म्हटले आहे. या प्रस्तावावर पीएमपी प्रशासन विचार करीत आहे. पीएमपीने भूखंड दिल्यास शहराच्या मध्यभागात मेट्रोचे माहिती केंद्र साकारले जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com