खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

लंडनमधील कंपनीचा महापालिकेकडे प्रस्ताव; अधिकाऱ्यांसमोर प्रात्यक्षिक सादर

पिंपरी - अत्याधुनिक पद्धतीने खड्डे बुजविणाऱ्या ‘इन्फ्रारेड रिसायकलिंग रोड पॅचिंग’ उपकरणाचे प्रात्यक्षिक शहर अभियंता अंबादास चव्हाण व महापालिकेतील अन्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ९) पाहिले. लंडनमधील ‘नू फाल्ट’ कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले असून, पुण्यातील ‘काम अविडा’ कंपनीमार्फत त्याचे मार्केटिंग सुरू आहे. 

लंडनमधील कंपनीचा महापालिकेकडे प्रस्ताव; अधिकाऱ्यांसमोर प्रात्यक्षिक सादर

पिंपरी - अत्याधुनिक पद्धतीने खड्डे बुजविणाऱ्या ‘इन्फ्रारेड रिसायकलिंग रोड पॅचिंग’ उपकरणाचे प्रात्यक्षिक शहर अभियंता अंबादास चव्हाण व महापालिकेतील अन्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ९) पाहिले. लंडनमधील ‘नू फाल्ट’ कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले असून, पुण्यातील ‘काम अविडा’ कंपनीमार्फत त्याचे मार्केटिंग सुरू आहे. 

दिल्ली, जयपूरमध्ये वापर 
दिल्ली आणि जयपूर महापालिकेतर्फे गेल्या पाच वर्षांपासून या तंत्रज्ञानाद्वारे खड्डे बुजविण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा कंपनीचा प्रस्ताव होता. त्यानुसार पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील रस्त्यावर त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. 

डांबरीकरणाचे आयुष्यमान वाढते
गेल्या महिन्यात पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना उपकरणाचे प्रात्यक्षिक दाखविले आहे. त्यांना हे उपकरण आवडले आहे. दीर्घ मुदतीच्या भाडेतत्त्वावर ते घेता येईल का, यावर प्रशासनाचा विचार विनिमय सुरू आहे. बऱ्याचदा खड्डा बुजविताना उंचवटा निर्माण होतो. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. या उपकरणामुळे भूपृष्ठाशी मिळताजुळता पॅच तयार होऊन खड्ड्याच्या आजूबाजूची जागा लॉक होते. त्यामुळे खड्डा बुजवलेल्या ठिकाणी डांबरीकरणाचे आयुष्यमान वाढते, असे काम अविडा कंपनीचे मार्केटिंग महाव्यवस्थापक सुधीर कुंभार यांनी सांगितले. 

असे होते डांबरीकरण
रस्त्यावर खड्डा पडलेल्या ठिकाणचा भाग गॅसच्या साह्याने तापविला जातो. त्यानंतर त्याठिकाणी डांबरमिश्रित रसायन टाकून बारीक खडी-मिश्रित थर टाकला जातो. त्यानंतर त्यावर छोटा रोलर फिरवला जातो. त्यामुळे खड्ड्यातील डांबरीकरणाचे आयुष्यमान वाढते.

कंपनीने प्रात्यक्षिक दाखविलेले आहे. त्या व्यतिरिक्त यंत्राबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या काही दिवसांत कंपनीकडून दरपत्रक सादर करण्यात येईल. त्यानंतर व्यावहारिक दृष्टिकोनातून त्यावर विचार होईल.
- अंबादास चव्हाण, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

उपकरणाचे फायदे...
केवळ वीस मिनिटांत एक बाय दोन मीटरचा खड्डा बुजविणे शक्‍य
ग्रीन टेक्‍नॉलॉजीमुळे खड्ड्याच्या ठिकाणच्या दगडमातीचा पुनर्वापर 
डांबरीकरणामुळे होणारे प्रदूषण प्रमाण थेट सात टक्‍क्‍यांपर्यंत घसरते
तंत्रज्ञानातून बुजवलेल्या खड्ड्याचे आयुष्यमान साधारणतः तीन वर्षे 
दरवर्षी खड्डा बुजविण्यासाठी होणाऱ्या खर्चात मोठी कपात
उपकरण हाताळण्यासाठी केवळ चार माणसांची गरज; मनुष्यबळात बचत