पालिका शाळांचे नगरसेवकांकडून ‘मार्केटिंग’

थेरगाव - महापालिका शाळांची वैशिष्ट्ये सांगणारा दर्शनी भागात लावलेला फलक.
थेरगाव - महापालिका शाळांची वैशिष्ट्ये सांगणारा दर्शनी भागात लावलेला फलक.

पिंपरी -  खासगी प्राथमिक शाळांशी स्पर्धा करत महापालिका प्राथमिक शाळाही मार्केटिंगमध्ये उतरल्या आहेत. घटत्या पटसंख्येवर उपाय म्हणून कृतीयुक्त अध्ययनाबरोबरच महापालिका शाळांमधूनही खासगीच्या तोडीस तोड सेमी इंग्रजी, संगणक शिक्षण, ग्रंथालय व शाळांमधील विविध उपक्रमांचे फ्लेक्‍सच्या माध्यमातून मार्केटिंग केले जात आहे. उपनगराच्या मुख्य चौकांच्या दर्शनी भागात शाळांचे फ्लेक्‍स लावून स्थानिक नगरसेवकांनी मार्केटिंग करण्याचे सकारात्मक पाऊल उचलले आहे. 

खासगी मराठी अथवा इंग्रजी माध्यमांच्या शाळा जाहिरातीच्या माध्यमातूनच प्रसिद्धीस येतात. मात्र, महापालिका शाळांकडून तसे प्रयत्न होत नाही. किंबहुना सरकारी शाळा आहे, दर्जाहीन शिक्षण मिळत असेल अशी सर्वसामान्यांची धारणा झालेली आहे. खासगी शाळांचा ‘मार्केटिंग फंडा’ वापरूनच महापालिका शाळांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न नगरसेवक अभिषेक बारणे यांनी केला आहे. थेरगाव गावठाण, बेलठीका नगर, वनदेवनगर, तापकीर चौक या परिसरात महापालिका शाळेत राबविलेल्या उपक्रमांची माहिती असलेले मोठे फलक दर्शनी भागात लावले आहेत.

‘आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या पाल्यास महापालिका शाळेत प्रवेश घ्या,’ अशा आशयाचे फलक लावून शाळेतील उपक्रमशील मुख्याध्यापिका रंजना बलकवडे व शिक्षक शरद लावंड यांनी शाळेने विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये मिळवलेले यश, बालवाडीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग, ई-लर्निंग, सुसज्ज ग्रंथालय, संगणक शिक्षण, बेंच, मोफत शालेय व क्रीडासाहित्य, शैक्षणिक सॉफ्टवेअर, विविध शिष्यवृत्त्या, मोफत आहार, वार्षिक स्नेहसंमेलन यासह इतर माहिती दिली आहे. पालकांनाही या उपक्रमांची माहिती होऊ लागली आहे. अशा उपक्रमांमुळे महापालिका शाळांची पटसंख्या किती वाढते हे आगामी काळात दिसणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील शाळांचे मार्केटिंग केल्यावर निश्‍चितच पटसंख्या वाढेल, असे मुख्याध्यापिका बलकवडे म्हणाल्या.

या परिसरात मध्यमवर्गीय राहताहेत. खासगी शाळांचे शुल्क परवडत नसतानादेखील ते खासगी शाळेत प्रवेश घेतात. महापालिका शाळांची वैशिष्ट्ये पालकांना माहिती नसल्यामुळे पालकांचा कल कमी झाला आहे. महापालिका शाळांचे मार्केटिंग केल्यामुळे पालकांची निश्‍चित मानसिकता बदलेल. 
- अभिषेक बारणे, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com