"नो हॉकर्स झोन'मागे कोटींचे "अर्थ'कारण 

"नो हॉकर्स झोन'मागे कोटींचे "अर्थ'कारण 

पिंपरी - महापालिकेने सर्वेक्षण केलेले फेरीवाले सुमारे 10 हजार 188; सर्वेक्षण न झालेले फेरीवाले सुमारे 12 हजार; त्यांच्याकडून खासगी व्यक्तींकडून सरासरी दरमहा तीन हजार रुपये भाडे वसूल; म्हणजेच महापालिकेचा दरमहा बुडीत महसूल सुमारे तीन कोटी 60 लाख तर, वार्षिक बुडीत महसूल सुमारे 43 कोटी 20 लाख रुपये, असे आहे हॉकर्स झोन न झाल्यामुळे शहरात निर्माण झालेले अर्थकारण. 

एकीकडे शहरातील फेरीवाले, टपरीवाले, पथारीवाले यांच्यावर महापालिका कारवाई करीत आहे; तर दुसरीकडे दहा वर्षांपासून हॉकर्स धोरणाचे भिजत घोंगडे आहे. शिवाय खासगी व्यक्तींकडून फेरीवाल्यांकडून सर्रास भाडे वसूल केले जाते. त्यामुळे शहराला बकालपणा येत आहे. महापालिकेने सर्वेक्षण केल्यानुसार 10 हजार 188 टपरी, पथारी, फेरीवाले शहरात आहेत. मात्र, सर्वेक्षण न झालेले सुमारे 10 ते 12 हजार फेरीवाले असण्याची शक्‍यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. त्यांना विशिष्ट जागेवर म्हणजे रस्त्याच्या कडेला किंवा पदपथावर अर्थात महापालिकेच्या जागेवर बसू देण्यासाठी दरमहा दोन ते चार हजार रुपयांपर्यंत भाडे खासगी व्यक्तींकडून वसूल केले जाते. मोक्‍याच्या ठिकाणांनुसार भाडे ठरत असते. अशी स्थिती पिंपरी कॅम्प, थेरगाव 16 नंबर बसस्टॉप, डांगे चौक, भोसरी-आळंदी रस्ता, भोसरी गव्हाणे वस्ती, चिखली साने चौक, जुनी सांगवी, दापोडी या भागात प्रकर्षाने जाणवते. 

विनापरवाना फेरीवाले व रस्त्याला अडथळा ठरणारे परवानाधारक टपऱ्या, हातगाडी, फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू आहे. त्यांच्याकडील साहित्य जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाते. 
- मकरंद निकम, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण निर्मूलन विभाग 

काय म्हणतात फेरीवाले 
वडापाव विक्रेता... 
आधी शरदनगरला हातगाडी लावत होतो. ती गाडी 16 हजार रुपयांची होती. पण, पंधरा दिवसांपूर्वी अतिक्रमणवाल्यांनी उचलून नेली. आता भाड्याची गाडी आहे. 50 रुपये रोज भाडे आहे. ती घरकुल चौकात लावतो. पंधराशे-सोळाशे रुपयांचा धंदा होतो. खर्च जाऊन चार-पाचशे रुपये सुटतात. सापडले की, अतिक्रमणवाले गाडी उचलून नेतात. पण, काय करणार. नवीन परवाने नगरपालिका देत नाही, म्हणून घाबरत घाबरत धंदा करावा लागतो. 

भाजीपाला विक्रेता... 
सासऱ्यांच्या शेतातील भाजीपाला आहे. सुरवातीला मंडईत घेऊन जात होतो. पण, व्यापाऱ्यांकडून कमी किंमत मिळते. म्हणून स्वतःच फिरून विक्री करतोय. त्यासाठी कर्ज काढून टेंपो घेतला. शाहूनगर, चिखली परिसरात तो उभा करतो. हंगामानुसार भाजीपाला असतो. सध्या मेथी, कोथिंबीर, पालक, शापू आहे. दहा रुपये गड्डीप्रमाणे विक्री होते आहे. ताजा माल मिळत असल्यामुळे काही ग्राहक ठरलेले आहेत. 

फिरता विक्रेता... 
टिकल्या, बांगड्या, कंगवे, हेअर बेल्ट विकतो. त्यासाठी हातगाडी भाड्याने घेतली आहे. दिवसभरात पाचशे-सहाशे रुपयांचा व्यवसाय होतो. पिंपरीतून माल आणतो. अतिक्रमणवाल्यांची भीती असते. पण, ते एका ठिकाणी थांबणाऱ्यांवर कारवाई करतात. हातगाडीसह सामान जप्त करतात. ते परत देत नाहीत. त्यामुळे मी एका ठिकाणी थांबत नाही, फिरत असतो. एका ठिकाणी थांबण्यापेक्षा फिरून जास्त धंदा होतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com