केंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान

tablets
tablets

पिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे किरकोळ औषध विक्रेत्यांसमोर बेरोजगारीचे संकट उभे ठाकणार आहे. ऑनलाइन औषध विक्रीमुळे कोणतीही औषधे सहजगत्या एका फोनवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या, नार्कोटिक औषधे ऑनलाइन मिळाल्यास त्याचा युवा पिढीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात केंद्र सरकारने 28 ऑगस्ट 2018 ला नियम प्रकाशित केले आहेत. त्याबाबत जनतेकडून 45 दिवसांत आक्षेप व सूचना मागविल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते नियम लागू होण्याची दाट शक्‍यता आहे. सध्या काही प्रमाणात विविध संकेतस्थळ आणि ऍपच्या माध्यमातून ऑनलाइन औषध विक्री सुरू आहे. या नव्या नियमांमुळे ऑनलाइन औषध विक्रीला कायदेशीर आधार मिळणार आहे. ऑनलाइन औषध विक्रीमध्ये विविध धोके असल्याने त्याला देशपातळीवरील केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने एक दिवसाचा बंद पुकारून नुकताच विरोध केला. ऑनलाइनमध्ये एक फार्मासिस्ट देशभरात औषध विकू शकतो. पर्यायाने, उत्पादक ते सुपर स्टॉकिस्ट, वितरक, किरकोळ विक्रेता ही साखळी मोडीत येऊ शकते. पर्यायाने, अनेक औषध विक्रेत्यांना बेरोजगारीला सामोरे जावे लागू शकते. 

ई-फार्मसी संदर्भातील केंद्राचे नियम : 
* नियम लागू झाल्यास ई-फार्मसी व्यावसायिकांना संकेतस्थळ किंवा अन्य ऑनलाइन माध्यमातून औषध विक्री करता येईल. 
* ई-फार्मसी चालविणाऱ्या व्यावसायिकाकडे ग्राहकांसाठी मदत आणि तक्रार निवारणाची व्यवस्था (आठवड्याचे 7 दिवस दररोज 12 तास) असायला हवी. 
* ग्राहकांसाठी सुरू केलेल्या सुविधा केंद्रात नोंदणीकृत फार्मासिस्ट असावा. तसेच, तेथे ग्राहकांच्या प्रश्‍नांची उत्तरे हेल्पलाइनच्या माध्यमातून द्यावी लागतील. 
* ई-फार्मसी चालविण्यासाठी केंद्र सरकारच्या ऑनलाइन पोर्टलवर केंद्रीय लाईसेंसिंग प्राधिकरणाकडे फार्मासिस्टला नोंदणी करावी लागणार आहे. 
* औषधे वितरित करण्यापूर्वी डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन संकेतस्थळावर टाकावे लागेल. तसेच, त्याचे रेकॉर्ड देखील ठेवावे लागेल. 
* ई-फार्मसी चालविणाऱ्यांना कोणत्याही माध्यमातून औषधांची जाहिरात करता येणार नाही. 

ऑनलाइन औषध विक्रीचे धोके : 
* देशभरातील सुमारे 8 लाख औषध विक्री दुकानदारांच्या व्यवसायाला बसू शकतो फटका 
* ऑनलाइनमध्ये डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन तपासण्यासाठी असणाऱ्या यंत्रणेबाबत संदिग्धता 
* प्रिस्क्रिप्शन चुकल्यास किंवा औषधाचा चुकीचा डोस मिळाल्यास रुग्णाच्या जिवाला धोका 
(व्हिडिओ पाहण्यासाठी क्‍लिक करा esakal facebook) 

""ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्या एका खासगी कंपनीचा परवाना रद्द केला आहे. तर, दुसऱ्या खासगी कंपनीबाबत आवश्‍यक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.'' 
- संजीव साखरीकर, सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन 

""ऑनलाइन औषध विक्रीमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, नार्कोटिक औषधे एका फोनवर सहजपणे मिळाल्यास त्याचे दुष्परिणाम युवा पिढीच्या आरोग्यावर होतील. काही परिस्थितीमध्ये बनावट प्रिस्क्रिप्शन बनवून देखील औषध खरेदी होऊ शकते.'' 
- संतोष खिंवसरा, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com