थोरात, नायर अखेर "स्वीकृत' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेत भाजपच्या स्वीकृत सदस्यपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविलेल्या ज्ञानेश्‍वर ऊर्फ माघली थोरात, बाबू नायर आणि ऍड. मोरेश्‍वर शेडगे यांच्या नावावर अखेर शुक्रवारी (ता. 19) सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब झाले; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे भाऊसाहेब भोईर आणि संजय वाबळे यांची निवड झाली. महापौर नितीन काळजे यांनी सभागृहात ही घोषणा केली. 

भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी या निवडीकडे पाठ फिरवली. मात्र, खासदार अमर साबळे सभागृहामागील ऍन्टीचेंबरमध्ये ठाण मांडून होते. नामदेव ढाके व केशव घोळवे यांनी स्वीकृत सदस्य निवडीचा प्रस्ताव मांडला. त्याला विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी अनुमोदन देत निवडीचा मार्ग मोकळा केला. नगरसचिव उल्हास जगताप यांनी स्वीकृत सदस्यांची नावे नऊ मे रोजीच निश्‍चित केल्याचे स्पष्ट केले. सत्तारूढ भाजपने थोडा अवधी मागितल्याने आज ही निवड सभागृहात करण्यात येत आली. तसेच रिपाइंने आयुक्तांना पाठविलेल्या नोटीशीला उशीर झाल्याने त्याचा विचार करता येणार नाही, असेही जगताप यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी त्यांनी सभागृहात नोटीस वाचून दाखविली. त्यानंतर महापौरांनी अधिकृत घोषणा केली. महापौर व खासदार अमर साबळे यांच्या हस्ते नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 

सभागृहाबाहेर भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एकच जल्लोष केला. निवडीनंतर भाजपच्या तिन्ही नवनियुक्त सदस्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. साबळे यांच्यासह सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.