तीस हजार मूर्तींचे दान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

पिंपरी - गणेशोत्सवाच्या काळात विविध स्वयंसेवी संघटनांकडून मूर्तिदान आणि निर्माल्यदान उपक्रम राबविण्यात आले. गेल्या बारा दिवसांमध्ये तब्बल ३० हजार ३६५ मूर्तींचे दान करण्यात आले. तसेच, २१ टन निर्माल्य जमा झाले. दान मूर्तींचे संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने वाकड येथील खाणीतील पाण्यात विधिवत विसर्जन करण्यात आले.

पिंपरी - गणेशोत्सवाच्या काळात विविध स्वयंसेवी संघटनांकडून मूर्तिदान आणि निर्माल्यदान उपक्रम राबविण्यात आले. गेल्या बारा दिवसांमध्ये तब्बल ३० हजार ३६५ मूर्तींचे दान करण्यात आले. तसेच, २१ टन निर्माल्य जमा झाले. दान मूर्तींचे संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने वाकड येथील खाणीतील पाण्यात विधिवत विसर्जन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या काळात सातवा, नववा, दहावा आणि बाराव्या दिवशी संस्कार प्रतिष्ठान आणि इतर सहयोगी घटकांनी महापालिकेला मूर्तिदानाबाबत भरीव मदत केली. या उपक्रमातून ३० हजार ३६५ मूर्तिदान मिळाले. दान मिळालेल्या मूर्तींचे वाकड येथील दगडाच्या खाणीत विधिवत विसर्जन करण्यात आल्याची माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांनी दिली. तसेच, निर्माल्यदान घेण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेज, प्रतिभा कॉलेज, जनवादी महिला संघटना, टाटा मोटर्स, मोरया इन्स्टिट्यूट, जन आरोग्य अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संस्कार- संस्कृती- सद्‌भावना महिला बचत गट, कमिन्स इंडिया लिमिटेड, सिंडिकेट बॅंक, गो विज्ञान संशोधन संस्था आणि संस्कार प्रतिष्ठान आदी संस्थांनी पुढाकार घेतला. 

शेकडो मंडळे गणेश तलाव, रावेत, वाल्हेकरवाडी, पिंपरी आणि थेरगावच्या घाटावर येत असतात. तसेच, मिरवणुका पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात भाविक येतात. बंदोबस्ताचे काम करणाऱ्या पोलिसांवर कामाचा अतिरिक्‍त ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी यंदाही पोलिस मित्र संघटना आणि स्वयंसेवी संघटनांच्या स्वयंसेवकांनी मदतीचा हात दिला. यामध्ये गजानन चिंचवडे यांच्या पोलिस मित्र संघटनेचे ७० कार्यकर्ते, डॉ. मोहन गायकवाड यांच्या संस्कार प्रतिष्ठानचे २०० कार्यकर्ते, विजय पाटील यांच्या प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे १८६ कार्यकर्ते, राहुल श्रीवास्तव यांच्या पोलिस नागरिक मित्र मंडळाचे १५० कार्यकर्ते, तसेच टाटा मोटर्सचे १०० मदतनीस ‘विशेष पोलिस अधिकारी’ म्हणून मदत करीत होते. अनिरुद्ध डिझास्टर मॅनेजमेंटचे ५० स्वयंसेवक, जैन फत्तेचंद शाळेच्या आरएसपीचे २५ विद्यार्थी सहभागी झाले होते.