सत्ताधारी भाजपमध्ये खदखद उफाळली ! 

सत्ताधारी भाजपमध्ये खदखद उफाळली ! 

पिंपरी - महापालिकेची सत्ता हस्तगत करून जेमतेम तीन महिने लोटलेले असताना सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांत मानापमान नाट्य सुरू झाले आहे. मोटारीचे निमित्त पुढे करून महापौर नितीन काळजे आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे. निमित्त मोटारीचे असले, तरी त्यामागील कारणे वेगळीच असल्याचे कळते. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांतील हा वाद आणखी चिघळण्याची शक्‍यता आहे. 

पालिकेत महापौर काळजे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे या तिघांना परस्परांमध्ये "पारदर्शक' कारभार दिसत नाही, हे या मानापमान नाट्याचे खरे कारण असल्याचे बोलले जाते. सावळे या आपल्याला विश्‍वासात घेत नाहीत, अशी महापौर आणि सत्तारूढ पक्षनेत्यांची तक्रार आहे, असे भाजपच्या एका नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटींवर स्पष्ट केले. 

महापौर काल काही कामासाठी पुण्यात गेले होते, ते परतत असताना वाटेत त्यांची मोटार नादुरुस्त झाली. त्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागली; परंतु भिडस्त महापौरांना मागणी मांडायची कशी, असा प्रश्‍न पडला. मोटारीची मागणी आपली नाही, हे सांगण्यासाठी त्यांनी थेट माध्यमांकडे पत्रक  प्रसिद्धीला दिले. सायंकाळी याच मुद्द्यावर स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्याशी महापौरांची खडाजंगी झाल्याचे कळते. महापौरांच्या दालनात हा प्रकार सुरू झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार चकमक उडाल्याचे कळते. 

रशिया दौऱ्यावर असलेल्या भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना हा प्रकार तत्काळ समजला. त्यांनी तेथूनच महापौरांना दूरध्वनी केला; पण महापौरांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. इकडे दिल्लीवरून काल रात्री परतलेल्या आमदार महेश लांडगे यांना काहीच कल्पना नव्हती. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून भोसरी विधानसभा मतदारसंघातील कामे रखडल्याने आज लांडगे यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांची तातडीने बैठक घेतली. महापालिकेचा नवीन आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच महासभेत मंजूर झाला; परंतु या अर्थसंकल्पाची प्रत लांडगे समर्थक नगरसेवकांना देण्यात आली नाही, त्यामुळे हे नगरसेवक नाराज आहेत. त्यांना प्रत्येक कामासाठी स्थायीच्या अध्यक्षांकडे नाक घासावे लागते. अध्यक्ष सावळे या जगताप समर्थक असल्याने आमची कामे होत नाहीत, अशी तक्रार लांडगे गटाच्या नगरसेवकांनी केली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे लांडगे यांनी मोशी येथे बैठक बोलावून आपल्या नगरसेवकांना कामे कशी करवून घ्यायची याचा  वर्ग घेऊन, प्रत्येक नगरसेवकाला विकासाचे "टार्गेट' दिले. मात्र, पालिकेची तिजोरी सीमा सावळे यांच्या ताब्यात असल्याने काय करायचे, अशी चिंता नगरसेवकांना आहे. कामे होत नाहीत म्हणून नगरसेवक नाराज आहेत. 

महापौरांना गाडी हवी कशाला? 
दरम्यान, जगताप समर्थक नगरसेवकांचा कानोसा घेतला असता महापौरांच्या मोटारीच्या कारणाची खिल्ली उडविण्यात आली. पहिल्या दिवशी बैलगाडीतून वाजतगाजत येणाऱ्या महापौरांना आता मोटार हवी कशाला, असा सवाल नगरसेवक करीत आहेत. सत्तारूढ पक्षाचे नेते एकनाथ पवार हे स्वत:ची  मोटार वापरतात, स्थायी समितीच्या अध्यक्षा सावळे यांच्याकडेही पालिकेची गाडी नाही. मग, महापौरांनाच गाडी कशाला हवी, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com