बालसंपादकांनी जाणले वृत्तविश्‍व

बालसंपादकांनी जाणले वृत्तविश्‍व

पिंपरी - चेहऱ्यावरील कुतुहलमिश्रित भाव.. त्याबाबत पडलेले असंख्य प्रश्‍न.. माध्यमांविषयीची आस्था आणि त्याच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा..असे भारावलेले वातावरण ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयाने सोमवारी (ता. ११) अनुभवले. निमित्त होते ‘बाल अतिथी संपादक’ उपक्रमाचे. शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या ‘सकाळ एनआयई’तर्फे ‘बालदिना’निमित्त हा उपक्रम आयोजिण्यात आला होता. शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक त्यामध्ये सहभागी झाले होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने विद्यार्थी भारावून गेले होते. त्यांनी ‘सकाळ’चे विशेष आभार मानले. 

वृत्तपत्र म्हणजे काय, वृत्तपत्राची नेमकी भूमिका आणि कार्य, वृत्तांकन कसे करावे, संपादन प्रक्रिया कशी असते, वृत्तपत्राची मांडणी, जाहिराती अशी वृत्तपत्राची कार्यशैली त्यांनी जाणून घेतली. संपादकीय विभाग आणि जाहिरात विभागाचे काम, संपादक आणि वार्ताहरावरील जबाबदाऱ्यांबाबत ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर यांनी माहिती दिली. वार्ताहर होण्यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्ये, गुणवैशिष्ट्यांचेही त्यांनी विश्‍लेषण केले. 

‘एनआयई’चे सह व्यवस्थापक विशाल सराफ यांनी ‘एनआयई’ उपक्रमामागील संकल्पना, त्याचे विद्यार्थ्यांना असलेले फायदे याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, यासाठी त्यांना ‘सकाळ’च्या अंकातील पहिल्या पानाची मांडणी करण्याची संधी देण्यात आली. त्यातील काही विद्यार्थ्यांनी संपादक, उपसंपादक आणि वार्ताहराची भूमिका पार पाडत अंकाची उत्कृष्टपणे मांडणी केली. 

निवडक लेखांना अंकात प्रसिद्धी
‘बाल अतिथी संपादक’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध दहा विषयांवर स्वतंत्र लेखन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या खास शैलीत केलेल्या लेखनापैकी निवडक लेख ‘एनआयई’च्या पुढील अकांत प्रसिद्ध करण्यात येतील. 

सहभागी शाळा
 शिक्षण प्रसारक मंडळी मराठी व इंग्रजी माध्यम शाळा, निगडी 
 मॉडर्न हायस्कूल, यमुनानगर, निगडी 
 कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे प्रेरणा माध्यमिक विद्यालय, निगडी 
 महापालिका भोसरी इंग्लिश मीडियम स्कूल भोसरी
 ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी प्राधिकरण
 आदर्श प्राथमिक शाळा सॅन्डविक कॉलनी, भोसरी 

विद्यार्थी म्हणतात...
तन्वी शिंदे - हा अत्यंत चांगला उपक्रम होता. ‘सकाळ’च्या अंकाची मांडणी करण्याची संधी मिळाली. त्यातून टीमवर्कचे महत्त्वही कळले. 

तनुजा मोरे - वृत्तपत्रातील कामकाज यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. ‘एनआयई’मुळे ते प्रत्यक्ष पाहता आले. समजून घेता आले. त्याबद्दल ‘सकाळ’चे आभार.

सिद्धी खेडेकर - ‘टीमवर्क’ने अंकाची मांडणी करताना खूप मजा आली. कोणतेही वृत्तपत्र प्रकाशित करत असताना त्यामागील कष्टाची जाणीव झाली. 

अनिशा जाधव - लेखन करण्यामागे किती विचार असतात, हे ‘सकाळ’साठी लेखन करताना कळले; तर टीमवर्कने उत्कृष्ट काम करता आले. 

हर्षल कुंभार - निबंध स्पर्धा आहे, या विचाराने येथे आलो होतो; परंतु येथे आल्यानंतर वृत्तपत्राची संपूर्ण माहिती मिळाली. 

श्रेयस साळवी - घरी आलेले वृत्तपत्र काही वेळेतच वाचून संपवितो. मात्र, त्यामागे एवढी मोठी यंत्रणा काम करते, मोठ्या कष्टातून मजकूर उभा केला जातो, हे येथे आल्यानंतरच समजले. 

श्‍वेता नखाते - ‘सकाळ’च्या कार्यालयाला भेट देऊन खूप आनंद झाला. संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांचे अनुभव ऐकता आले. 

अनिष्का तोडकर - अंकाची सजावट करण्याचा उपक्रम खूपच आवडला. बातमी, जाहिरातीची जागा निश्‍चित करताना लागणारी कसोटी अनुभवायला मिळाली. 

तनिष्का तोडकर - वृत्तपत्राच्या कार्यालयात जाण्याची संधी मिळेल, असे कधीही वाटले नव्हते; पण एनआयईमुळे ही संधी मिळाली. त्यातून करिअरचा नवीन दृष्टिकोन मिळाला. 

वृत्ती काळे - आम्ही तर पेपर रोजच वाचतो; पण बातमीपासून वृत्तपत्राचा प्रवास आज कळाला. वाचकांना दर्जेदार वाचायला मिळावे, यासाठी किती कष्ट केले जातात, हे पाहायला मिळाले. 

शताक्षी कुलकर्णी - बातमीला अंकात मिळणारे स्थान, तिच्या दर्जावर अवलंबून असते. घटनांचा क्रम कसा ठरविला जातो, त्याची रचनाही येथे प्रत्यक्ष बघता आली.

आदिती संबाळे - ‘सकाळ’मुळे आज स्वत:चे विचार, मते कळली. शंकांचे निरसन झाले. वार्ताहर कसा हवा, आपल्या गुण कसे विकसित करावे, हेदेखील कळले.

रिद्धी हिरनाईक - वृत्तपत्र कशाप्रकारे प्रसिद्ध होते, याची संपूर्ण माहिती या उपक्रमांतर्गत मिळाली. कोणतेही वृत्त देताना बातमीदारामध्ये आवश्‍यक असलेले गुणांचा परिचय झाला. 

सिद्धी पवार - ‘सकाळ’साठी लेखन करताना बुद्धीला चालना मिळाली; तर आपल्याला वाचकांपर्यंत नेमके काय पोचवायचे आहे, या मार्गदर्शनही मिळाले. 

साक्षी हिंगे - टीमवर्क कसे असावे आणि ते कसे करावे हे कळले. अंकाची मांडणी करताना टीमवर्क करण्याची संधी मिळाली.

शिक्षक म्हणतात...
मनीषा बोत्रे - विद्यार्थिदशेतच वृत्तपत्राचे कामकाज पाहायला मिळणे, ही समाधानकारक बाब आहे. यातून त्यांच्या जडणघडणीला चांगला वाव मिळेल. तसेच, करिअर निवडीच्या संधी मिळतील.

कांचन नारखेडे - आतापर्यंत आम्ही व विद्यार्थी वृत्तपत्राचे केवळ वाचन करत होतो; पण आज प्रत्यक्ष त्याचे कामकाज पाहायला मिळाले. विशेषत: विद्यार्थ्यांना ती संधी मिळाल्याने त्या भविष्यात त्याला फायदा होईल. 

मृणाल धसे - विद्यार्थ्यांना ही संधी मिळाल्याने वृत्तपत्रे, माध्यमांबाबतची त्यांची आत्मीयता निश्‍चितच वाढेल. किंबहुना, एका वेगळ्या दृष्टिकोनातून वृत्ताकडे तसेच वृत्तपत्राकडे ते पाहतील. 

गंगाधर भदाडे - आपल्यापर्यंत बातमी कशी येते, तिचा प्रवास याबाबत नेमकेपणाने माहिती मिळाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com