फटाका विक्री स्टॉल नियमावलीकडे दुर्लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

आरसीसी बांधकामामध्ये असलेले फटका विक्री व महापालिकेच्या प्रभागामार्फत लिलावातील स्टॉललाच अग्निशामक दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. 
- किरण गावडे, मुख्य अग्निशामक अधिकारी 

पिंपरी - दिवाळीनिमित्त शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फटाका विक्री स्टॉल विनापरवानगी व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. शहरात 2016 मध्ये फक्त 93 तर या वर्षी आतापर्यंत 66 जणांनी फटाका विक्रीसाठी परवानगी घेतलेली असल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली आहे. 

फटाका विक्री स्टॉलसाठी अग्निशामक दल व पोलिस प्रशासनाने नागरिकांच्या जिवीताच्या दृष्टिकोनातून नियमावली तयार केली आहे. मात्र, अनेक स्टॉलधारक या नियमांना पायदळी तुडवत स्टॉल उभारतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. शहरासह उपनगरात पदपथावर तसेच वर्दळीच्या ठिकाणी फटाका स्टॉल उभारण्यात आले आहेत. तर अनेकांनी किराणा दुकानात फटाकांच्या राजरोसपणे विक्री सुरू केली आहे. 

भूतकाळातील घटनांमधून धडा घ्या 
गेल्या वर्षी औरंगाबादमध्ये फटाक्‍यांच्या स्टॉलला लागलेल्या आगीत करोडोंचे नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. तसेच, फटाक्‍यांमुळे आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रशासन मात्र, या घटनांकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. 

पोलिस चौकीसमोर बेकायदा स्टॉल 
संत तुकारामनगर पोलिस चौकीसमोर अग्निशामक दलाने फटाका स्टॉलसाठी परवानगी दिल नसतानाही पदपथावर फटाका स्टॉल उभारण्यात आले आहेत. पोलिस व प्रभाग कार्यालयांना अशा बेकायदा फटाका स्टॉलवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. याबाबत सहायक आयुक्त राम मांडुरके म्हणाले, ""फटाका स्टॉलसाठी परवानगी पोलिस आयुक्त कार्यालयातून दिली जाते.'' 

तात्पुरता फटाका स्टॉल नियमावली 
* फटाका जास्तीत जास्त साठा व मर्यादा 50 किलो 
* स्टॉलवर वाळू, पाण्याच्या बादल्या व अग्निशामक साधने असावीत, 200 लिटर पाणीसाठा असावा 
* शोभेच्या दारूव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूची विक्री करू नये 
* जलद, ज्वालाग्राही फटाके स्वतंत्र पॅकिंगमध्ये ठेवावीत 
* धूम्रपान निषेध फलक ठळक इंग्रजी/मराठी भाषेत लावावा 
* फटाक्‍यांची मांडणी दुकानाचे शटरबाहेर करू नये, रस्त्यावर अतिक्रमण करू नये 
* स्फोटक, ज्वलनशील, पेट्रोलजन्य पदार्थ स्टॉलजवळ ठेवू नये 
* लहान मुले, अपंग, अपरिचित व्यक्तीला स्टॉलवर बसवू नये 
* फटाका स्टॉलचे नाव ठळकपणे दिसेल असा बोर्ड असावा 
* फटाका स्टॉलसाठी पोलिस, महापालिका, अग्निशामक दलाची परवानगी आवश्‍यक 
* आजूबाजूचे नागरिक व इतरांनी अग्निशामक दलाकडे तक्रार केल्यास ना हरकत रद्द होते