चवदार मिठाईची लज्जत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पिंपरी - दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव. या सणाला घरोघरी दिवे पेटवून अंधारवाटा पुसत जाण्याचाच जणू आपण निश्‍चय करतो. दिवाळीनिमित्त नातेवाईक, मित्र परिवाराला खास भेट देण्यासाठी ड्रायफ्रूट कॅडबरी, विविध कॅडबरींचे सेलिब्रेशन पॅक, मिक्‍स मिठाई, सुक्‍यामेवा असे विविध प्रकार बाजारपेठेत पाहण्यास मिळत आहेत. दीपोत्सवानिमित्त तयार फराळाबरोबरच चवदार मिठाई सोबत असल्यास त्याची लज्जत नक्कीच वाढणार आहे.

पिस्ता, काजू, बदाम, किसमिस, खारीक अशा विविध सुकामेव्याचे आकर्षण प्रत्येकालाच असते. त्याचं सुका मेव्याला मस्त वेष्टनात गुंडाळून दिल्यावर ती नातेवाईक, मित्र परिवार यांना भेट देण्यासाठी एक चांगली भेटवस्तू ठरू शकते. १६० ग्रॅमपासून एक किलोपर्यंत सुका मेव्याचे पॅकिंग उपलब्ध आहे. ३५० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे. फरसाण, रसगुल्ला, चिवडा, सोनपापडी, बदाम हलवा आदी मिठाईच्या अर्धा, एक किलोमधील पॅकिंगला देखील चांगली मागणी आहे. त्याशिवाय मलाई पेढा, काजू कतली आदी मिठाईलाही पसंती मिळत आहे.

ड्रायफ्रूट कॅडबरी हा एक नवा प्रकार. त्यामध्ये सुका मेव्याला कॅडबरी लावलेली असते. त्यामुळे बालगोपाळांसह घरातील प्रत्येकालाच त्याची गोडी वाटू शकते. २५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत ही ड्रायफ्रूट कॅडबरी मिळत आहे. त्याला चांगली मागणी असल्याची माहिती मिठाई विक्रेते सुनील भाटी यांनी दिली. विविध कॅडबरी एकत्रित असलेले सेलिब्रेशन पॅकदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. ५०, १०० आणि १६० रुपये अशा विविध दरांमध्ये ते विकले जात आहे. 

मिक्‍स मिठाईचा ट्रेंड
मिक्‍स मिठाईचा ‘ट्रेंड’ सध्या रुजला आहे. रवा लाडू, सोनपापडी, बदामी हलवा, पिस्ता, बर्फी, चॉकलेट बर्फी, बालुशाही, पेढा, म्हैसूर पाक, पापडी हलवा आदी मिठाईचे एकत्रित स्वरूपात पॅकिंग करून विकले जातात. त्यामुळे एकाच वेळी विविध प्रकारच्या मिठाईचा आस्वाद आपल्याला घेता येतो. अर्धा किलोपासून हे पॅकिंग मिळते. त्याशिवाय मिक्‍स बर्फी हा प्रकारही चांगलाच प्रचलित झाला आहे. स्ट्रॉबेरी, पायनॅपल, बटरस्कॉच, पिस्ता, चॉकलेट, चोकोबार, क्रीम, मॅंगो, कलाकंद आदी प्रकारातील बर्फीचे एकत्रित पॅकिंग करून आकर्षक सजावटीत ते विकले जात आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त अशी मिक्‍स बर्फी घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.