जागरूकता वाढली; प्रदूषण घटले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पिंपरी - शहरातील नागरिकांमध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत जागरूकता आली असल्याचे चित्र दिवाळीदरम्यान पाहायला मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण दोन ठिकाणी तीन ते चार डेसिबलने कमी झाल्याचे चाचण्यांमधून समोर आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी सांगितले.

पिंपरी - शहरातील नागरिकांमध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत जागरूकता आली असल्याचे चित्र दिवाळीदरम्यान पाहायला मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण दोन ठिकाणी तीन ते चार डेसिबलने कमी झाल्याचे चाचण्यांमधून समोर आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी सांगितले.

चिंचवडमध्ये मात्र ध्वनिप्रदूषणात किंचित वाढ झाली होती.
ध्वनिप्रदूषणासंदर्भात मंडळाकडून करण्यात आलेला प्रचार आणि नागरिकांमध्ये त्यासंदर्भात झालेले प्रबोधन यामुळे हे प्रमाण कमी झाले असल्याचे मत शिंदे यांनी नोंदवले आहे. यंदा प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून शहरात पिंपरीतील डीलक्‍स चौक, चिंचवडमधील चापेकर चौक आणि थेरगाव येथील डांगे चौकात 19 ते 21 ऑक्‍टोबरदरम्यान ध्वनिप्रदूषणाची चाचणी सकाळी आणि संध्याकाळी करण्यात आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाला पिंपरीमधील ध्वनिप्रदूषणाची पातळी 73.3, चिंचवडमध्ये 75.7 आणि थेरगावमध्ये 73 डेसिबल इतकी होती. गेल्या वर्षी याच दिवशी ही पातळी पिंपरीत 74.7, चिंचवडमध्ये 69.3 आणि थेरगावमध्ये 76.3 डेसिबल इतकी नोंदवण्यात आली होती. यंदा पिंपरी आणि थेरगाव वगळता चिंचवडमधील आवाजाची पातळीत सहा डेसिबलने वाढ झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पाडव्याच्या दिवशी शहरात आवाजाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. त्याचदिवशी पिंपरीत 59.6, चिंचवडमध्ये 57.8 आणि थेरगावमध्ये 65.3 डेसिबल इतकी आवाजाची पातळी होती, तर भाऊबिजेला या तिन्ही ठिकाणची आवाजाची पातळी याच दरम्यान होती. नागरिकांमध्ये फटाके वाजण्याबाबतची जागरूकता वाढत गेल्यास दिवाळीदरम्यान जाणवणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या पातळीत चांगली घट होईल, असे शिंदे म्हणाले.

दोन वर्षांतील ध्वनिप्रदूषणाची पातळी
वर्ष विभाग ध्वनिप्रदूषण पातळी (डेसिबलमध्ये)

2016 पिंपरी, डीलक्‍स चौक 74.7 ते 62.2
चिंचवड चापेकर चौक 69.3 ते 58.6
थेरगाव, डांगे चौक 76.3 ते 69.2

2017 पिंपरी, डीलक्‍स चौक 73.3 ते 59.6
चिंचवड चापेकर चौक 75.7 ते 58.6
थेरगाव, डांगे चौक 73.0 ते 65.3