लढाऊ विमान पाहण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवडकर विशेषत: विद्यार्थ्यांसाठी ‘खूश खबर’आहे. लवकरच त्यांना ‘मिग २३’ हे लढाऊ विमान जवळून पाहण्याची-अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. भारतीय हवाई दलामध्ये अभिमानास्पद कामगिरी करणारे हे विमान आठवड्यात चिंचवड येथील विज्ञान केंद्रात (सायन्स पार्क) दाखल होणार आहे. शहरवासीयांना विज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान, भारतीय लष्कराचीही माहिती व्हावी, हा त्या मागील उद्देश आहे. 

विज्ञान केंद्राच्या प्रवेशद्वारजवळ दर्शनी भागामध्ये हे विमान बसविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्मचे काम सुरू आहे. आठवड्यात हे काम पूर्ण करण्यात येईल. उत्तरेकडे आकाशाच्या दिशेने झेपावत (टेक ऑफ पोझिशन) आहे, अशा पद्धतीने ते बसविले जाणार आहे.  सेवेतून निवृत्त झालेले हे विमान सध्या नाशिक येथे आहे. तेथून तीन तुकड्यांमध्ये पाठविले जाणार आहे. त्यानंतर संबंधित तंत्रज्ञ अधिकारी येथे येऊन त्याची जोडणी करतील. 

‘‘‘मीग २३’ हे  रशियन बनावटीचे विमान आहे. कारगिल युद्धामध्ये त्याचा वापर केला होता. ‘लढाऊ’ विमान उपलब्ध करून द्यावे, अशा आशयाचा पत्रव्यवहार विज्ञान केंद्राने केला होता. काही दिवसांपूर्वीच त्याबाबत पत्र आले. त्यामध्ये विमान देण्याची तयारी दर्शविली. त्याला आम्ही होकार कळविताच हालचालींना वेग आला. त्याची पूर्वतयारीही अंतिम टप्प्यात आली आहे,’’ अशी माहिती पिंपरी- चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता; तसेच विज्ञान केंद्राचे समन्वयक प्रवीण तुपे यांनी दिली. 

ते म्हणाले, ‘‘विनाशुल्क स्वरूपात हे विमान देण्यात आले आहे. मात्र, येथून पुढील देखभाल, दुरस्तीची जबाबदारी केंद्राची आहे. दोन माणसे बसू शकतील, अशी त्याची रचना आहे. सध्या त्यामध्ये इंजिन नसले, तरी लढाऊ विमान प्रत्यक्ष कसे दिसते, त्यातील अंतर्गत रचना कशी असते, त्याचे कार्य कसे चालते, याची माहिती मिळणार आहे.’’