ग्रेडसेपरेटर रस्ता पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

पिंपरी - शहरात सुरू असणारी विकासकामे पूर्ण करण्यासाठी कासारवाडी ते खराळवाडीदरम्यानचा ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र सेवा रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ग्रेडसेपरेटर बुधवारपासून पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, या रस्त्याचा पुन्हा आढावा घेऊन त्यासंदर्भातील निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. 

ग्रेडसेपरेटर बंद झाल्यानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची अडचण झाली होती. सेवा रस्त्यावर लागलेली वाहनांची रांग हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स कंपनीच्या गेटपर्यंत गेली होती. ग्रेडसेपरेटर बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र मंगळवारी सेवा रस्त्यावर पाहायला मिळाले होते. दरम्यान, ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय संबंधित विकसक आणि वाहतूक पोलिसांकडून घेण्यात आल्यानंतर त्याची माहिती देणारे फलक रस्त्यावर लावले होते. मात्र, या रस्त्यावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून ग्रेडसेपरेटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेण्यात आला.एक दिवस ग्रेडसेपरेटर बंद ठेवल्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीत नेमक्‍या कोणत्या प्रकारच्या अडचणी येत आहेत, कोणत्या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे, याचा अभ्यास वाहतूक पोलिसांना करावा लागणार असून त्यानंतरच ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यासंदर्भात अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. 

दरम्यान, ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. रस्त्यावरील वाहतुकीला खोळंबा करून चुकीच्या पद्धतीने वाहतूक वळविणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत अनेक वाहनचालकांनी व्यक्‍त केले. ग्रेडसेपरेटरमधील काम एकदम सुरू करण्यापेक्षा ते टप्प्याटप्प्याने केले असते तर वाहनांचा खोळंबा झाला नसता. मात्र, संबंधित विकसकाकडून योग्य नियोजन न झाल्यामुळे या ठिकाणच्या वाहतूक समस्येमध्ये भर पडणार असल्याचे मत काही जणांनी व्यक्‍त केले.