‘समरसता’ गुरुकुलम आर्थिक अडचणीत

संदीप घिसे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

मदतीसाठी पत्ता
समरसता पुनरुत्थान गुरुकुलम, गावडे जलतरण तलावाशेजारी, चिंचवडगाव, पुणे.
बॅंक ऑफ महाराष्ट्र, चिंचवड शाखा, खाते क्रमांक २०१६०४१७०५६. आयएफएफसी कोड MAHB००००१२७G

पिंपरी - चिंचवड येथील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम या संस्थेतर्फे वंचित समाजातील ३२९ विद्यार्थ्यांना निवासी शाळेत शिक्षण दिले जाते. विनाअनुदानित असलेल्या या संस्थेला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी, राष्ट्रीय नेत्यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुकही केले आहे; मात्र सध्या ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली आहे. वीजबिल न भरल्याने येथील विद्यार्थी १५ दिवस अंधारात होते. आजही लाखो रुपयांचे वीजबिल, मिळकतकर आणि शिक्षकांचे पगार थकले आहेत.

भटक्‍या विमुक्‍त जातीतील, तसेच आदिवासी भागातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी २००६ मध्ये समरसता पुनरुत्थान गुरुकुलम या संस्थेची स्थापना करण्यात आली. सध्या या निवासी शाळेत २०० मुले आणि १२९ मुली पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. याशिवाय येथील विद्यार्थ्यांना गणपतीच्या मूर्ती, कंदील, पणत्या, सुतारकाम अशा विविध प्रकारचे शिक्षणही दिले जाते. येथील विद्यार्थ्यांची देखभाल करण्यासाठी, तसेच त्यांना शिकविण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा एक लाख ७५ हजारइतके वेतन द्यावे लागत आहे.

या संस्थेला ४० हजार रुपये मासिक वीजबिल येत असून, आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे वीजबिल भरले नाही. या वीजबिलाची थकबाकी एक लाखावर गेल्याने वीज महामंडळाने १५ दिवस वीजपुरवठा खंडित केला होता. यामुळे विद्यार्थ्यांना अंधारातच राहावे लागले. अखेर शिक्षकांचा पगार न देता वीजबिल भरल्यानंतरच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला; मात्र आता शिक्षकांचे वेतन कसे द्यायचे, असा प्रश्‍न संस्थेसमोर निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागानेही सहा लाख रुपयांची मिळकतकर थकबाकीची अंतिम नोटीस पाठविली आहे. मिळकतकर न भरल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. यामुळे हे पैसे भरायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेने येथील मालमत्ता सील केली, तर ३२९ विद्यार्थ्यांना ठेवायचे कुठे, असा प्रश्‍न गुरुकुलमचे संस्थापक गिरीश प्रभुणे यांना पडला आहे.

या मान्यवरांनी दिल्या गुरुकुलमला भेटी
समरसता पुनरुत्थान गुरुकुलम या संस्थेला माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे  आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुकही केले आहे.

पाच वर्षांनंतरही अनुदान नाही
समरसता पुनरुत्थान गुरुकुलमच्या कामाची माहिती तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी संस्थेला अनुदान मिळावे, याकरिता अर्ज करण्यास सांगितले; मात्र दुर्दैवाने पुढे त्यांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राष्ट्रीय स्तरावर ‘गुरुकुलम’च्या धर्तीवर कार्यक्रम राबविण्याचा विचार सुरू आहे. राज्यात भाजपची सत्ता येऊन तीन वर्षे होत आहेत; मात्र अद्यापही या संस्थेच्या अनुदानाबाबत विचार झालेला नाही.

समरसता पुनरुत्थान गुरुकुलम ही संस्था सध्या आर्थिक अडचणीत आहे. ३५० जणांना दोन वेळा जेवण, दोन वेळा नाश्‍ता व एकदा चहा यासाठी दररोज १५ हजारांचा खर्च येतो. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी लागणारे लाकूड, कोळसा, माती यासाठी दोन हजारांचा खर्च येतो. संस्था अडचणीत असल्याने दानशूर व्यक्‍तींनी संस्थेस सढळ हस्ते मदत करावी.
- गिरीश प्रभुणे, संस्थापक-समरसता पुनरुत्थान गुरुकुलम

Web Title: pimpri news Gurukulam mohan bhagwat