शहरात ठिकठिकाणी बेवारस वाहने पडून

Helpless-Vehicle
Helpless-Vehicle

पिंपरी - शहरासह उपनगरात ठिकठिकाणी बेवारस वाहने धूळ खात पडून आहेत. या वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, अन्य महापालिकांप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही बेवारस वाहने संकलित करून त्यांचा लिलाव केल्यास महसूल तर मिळेलच तसेच रस्त्यावर अडवलेली जागाही मोकळी होईल. ती वाहने चोरीची असल्यास संबंधितांना ती परत मिळू शकतात. 

येथे आहेत बेवारस वाहने
पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे पेट्रोल पंपाजवळ अनेक महिन्यांपासून मोटार पडून असल्याचे विनायक बागडे व दिलीप नारखेडे यांनी कळवले. 

नेहरूनगर चौकाजवळ बेवारस मोटार असल्याचे लोईस आढाव यांनी सांगितले. 

भोसरीतील जय गणेश साम्राज्य पार्किंगमध्ये दोन वर्षांपासून दोन मोटारी पडून आहेत, असे कैलास आवटे यांचे म्हणणे आहे. 

नाशिक फाट्याजवळील कल्पतरू इस्टेट सोसायटीजवळ गेल्या वर्षभरापासून मोटार पडून असल्याचे विकास फडणीस यांनी सांगितले. 

हिंजवडी-फेज एक, साई इन्फोटेक कंपनीसमोर दोन दुचाकी बऱ्याच महिन्यापासून पडून आहेत, तर बिजलीनगरमध्येही एक दुचाकी अनेक वर्षांपासून बेवारस पडून आहे, अशी माहिती हिंजवडी येथील महेश वाघमारे यांनी दिली. 

रहाटणीतील पार्क रॉयल सोसायटीसमोर दोन मोटारी अनेक महिन्यांपासून पडून आहेत. या मोटारीत दारू पिणे व इतर उद्योग चालतात. तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, असे उदय साबदे यांनी म्हटले आहे. 

नवी सांगवीतील कृष्णानगर रस्ता क्रमांक दोन, कृष्णा चौकात दुचाकी बेवारसपणे धूळ खात असल्याचे जगदीश सोनवणे यांनी कळवले आहे. 

पिंपरी-रहाटणी रस्त्यावर अनेक वर्षांपासून बेवारस वाहने पडून आहेत. अशा बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी जी. एस. कांबळे यांनी केली आहे. 

चिंचवडमधील बर्डव्हॅली उद्यानामागे वीर सावरकर चौकात अनेक वर्षांपासून दोन मोटारी पडून आहेत. याबाबत अनेकदा प्रशासनाला सांगूनही काहीच उपयोग झाला नसल्याची, राजाराम कुमठेकर यांची तक्रार आहे. 

उद्यमनगर, पूजा पॅलेससमोर सहा महिन्यांपासून मुंबई पासिंगची टॅक्‍सी व इतर सात गाड्या उभ्या आहेत, असे ॲड. राजरत्न जाधव यांनी कळवले.

वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने वाहतूक विभागामार्फत उचलली जातात; मात्र इतर बेवारस वाहनांचा पंचनामा करून संबंधित पोलिस ठाणे ते जमा करते. त्यासाठी महापालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवणे गरजेचे आहे. 
- राजेंद्र भामरे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग 

आठही प्रभाग अधिकाऱ्यांकडून कार्यक्षेत्रातील बेवारस वाहनांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. भूमी व जिंदगी विभागाकडून जागा घेऊन त्या ठिकाणी ही वाहने संकलित केली जाणार आहेत. त्यानंतर संबंधित मालकांचा शोध घेतला जाईल. याबाबत १९ मार्चला परिपत्रक काढले असून एक महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 
- प्रवीण तुपे, सहशहर अभियंता, महापालिका

महापालिका प्रशासन उदासीन का? 
पुणे व ठाणे महापालिकेने बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम नुकतीच राबवली. हे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेला का जमत नाही, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com