‘एचए’च्या जमिनीवर महापालिकेचे आरक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

पिंपरी - हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीच्या नेहरूनगर येथील जागेवर महापालिका आरक्षण टाकणार आहे. या बदल्यात कंपनीला टीडीआर देण्याचे नियोजन केले असल्याचे महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी ‘सकाळ’ला सांगितले. येत्या २० जून रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

एचएने ८७ एकर जमीन विक्रीसाठी काढली आहे. ती सरकारी यंत्रणांनाच खरेदी करता येणार आहे. पिंपरीतील नेहरूनगर परिसरात एचएची ५९ एकर जमीन आहे. त्यावर सार्वजनिक सुविधा देण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. 

अनेक वर्षांपासून एचए तोट्यात आहे. तो कमी करण्यासाठी कंपनीने जमीन विक्रीला काढली असून, त्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित जागा सार्वजनिक सुविधांसाठी पिंपरी महापालिकेला मिळावी, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. ही जागा ‘बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान’ म्हणून आरक्षित केल्यास नागरिकांना त्या ठिकाणी विविध सोयीसुविधा पुरविणे शक्‍य होणार आहे. या जागेवर क्रीडा स्पर्धा, प्रदर्शन, सर्कस, व्याख्यानमाला, राजकीय सभा, संगीत रजनी, शैक्षणिक, सामाजिक उपक्रम, स्नेहसंमेलन, वाहनतळ, हेलिपॅड आदींसाठी उपयोग करण्याचे नियोजन आहे. या जागेतील १० टक्के क्षेत्रामध्ये पालिकेचे प्रशासकीय कार्यालय, सभागृह, उपाहारगृह, दुकाने, गाळे, स्वच्छतागृह, गेस्ट हाउस, कर्मचारी वसाहत, अग्निशामक केंद्र, बॅंक एटीएम, तातडीचे वैद्यकीय सेवा केंद्र, व्यायामशाळा, वाचनालय आदींसाठी सोयीसुविधा निश्‍चित करता येतील. या आरक्षणाचे ९० टक्के क्षेत्र कायमस्वरूपी खुले ठेवण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात येणार आहे. या जागेच्या मोबदल्यात कंपनीला टीडीआर देण्याचा विचार महापालिका करत आहे.

दरम्यान, एचए कंपनीची नेहरूनगर येथील ५९ एकर जमीन मध्यवर्ती असून, मोक्‍याची आहे. ती इतर कुणाच्या घशात जाण्यापेक्षा नागरिकांच्या सार्वजनिक हितासाठी ताब्यात घेऊन विकसित केली तर फायदेशीर ठरेल. त्यासाठी सर्वसाधारण सभेत तसा प्रस्ताव ठेवला आहे. आयुक्तांनी तो तयार केला आहे, असे पवार यांनी सांगितले.