जपानच्या धर्तीवर रेल्वेचा विकास करणार - सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

हिंजवडी - ‘‘येत्या काही वर्षांतच देशात रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल. जपान आणि चीनच्या धर्तीवर भारतातही त्याच गतीने रेल्वेचा परिपूर्ण विकास करण्याचा सरकारचा मानस आहे,’’ असे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी (ता. १६) हिंजवडी येथे बोलताना व्यक्त केले. 

हिंजवडी - ‘‘येत्या काही वर्षांतच देशात रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल. जपान आणि चीनच्या धर्तीवर भारतातही त्याच गतीने रेल्वेचा परिपूर्ण विकास करण्याचा सरकारचा मानस आहे,’’ असे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी (ता. १६) हिंजवडी येथे बोलताना व्यक्त केले. 

येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझीनेसच्या  (एसआयआयबी) रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, थायसनक्रुप इंडियाचे उपाध्यक्ष दारा दमानिया, एसआयआयबीच्या संचालिका डॉ. अस्मिता चिटणीस आदी उपस्थित होते. या वेळी एसआयआयबीच्या वाटचालीवर आधारित ‘कॉफीटेबल’ पुस्तकाचे प्रकाशन प्रभू यांनी केले. 

प्रभू म्हणाले, ‘‘चीन आणि जपान या देशांनी रेल्वे क्षेत्रात गुंतवणूक करण्याची सुरवात पूर्वीपासून केली आहे. त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरघोस तरतूद केली. मात्र, त्या तुलनेत आपण मागे आहोत. देशात रेल्वेचा विकास होण्यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भरघोस आर्थिक तरतूद केली आहे. देशात ४० हजार रेल्वेडब्यांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. मीटरगेज लोहमार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर सुरू असून कालांतराने त्यांचे विद्युतीकरण करण्यात येईल. देशातील ४० ते ५० रेल्वेस्थानकांचा चेहरामोहरा बदलला जाणार असून ती स्थानके विमानतळासारखी करण्यावर भर दिला जाणार आहे. रेल्वेत इकॅटरिंग सर्व्हिसला प्रोत्साहन देण्यात येत असून येत्या काळात प्रवाशांच्या समस्या व तक्रारी ‘रिअल टाइम’वर सोडविण्यास भर दिला जाईल. मुंबई-दिल्ली, दिल्ली-कोलकता रेल्वेमार्गांवर येत्या काही दिवसांत २०० किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवासी रेल्वेसेवा चालविण्याचा संकल्प आहे.’’  या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘‘भारताला भ्रष्टाचार, गरिबी अशा समस्यांनी ग्रासले आहे. अशा वेळी देशाला आधार कार्डची गरज नाही, तर उत्तम दर्जाच्या उच्च शिक्षण सुविधेची आवश्‍यकता आहे.’’

प्रभू यांच्या हस्ते उद्योजक अरुण फिरोदिया, संजय किर्लोस्कर, एस. के. जैन तसेच संस्थेच्या माजी संचालकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. येरवडेकर यांचे भाषण झाले. या समारंभानंतर उस्ताद सुजात खालन, पंडित रोणू मुजुमदार आणि पंडित अरविंद कुमार आझाद यांचा सांगीतिक कार्यक्रम झाला.