‘हिंजवडीच्या समस्या गांभीर्याने घेणार कधी?’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील जटिल वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘दुष्टचक्रात हिंजवडी’ या वृत्तमालिकेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संपर्क साधत ‘सकाळ’चे विशेष आभार मानले. तसेच समाधान व्यक्त केले. दररोजच्या वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या अनेक आयटीयन्सनी त्यावरील काही उपाययोजनादेखील सुचविल्या. तर महाराष्ट्राची विशेषतः पुण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या हिंजवडीच्या समस्यांकडे शासन गांभीर्याने कधी पाहणार, असा प्रश्‍नही उपस्थित केला.

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील जटिल वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘दुष्टचक्रात हिंजवडी’ या वृत्तमालिकेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संपर्क साधत ‘सकाळ’चे विशेष आभार मानले. तसेच समाधान व्यक्त केले. दररोजच्या वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या अनेक आयटीयन्सनी त्यावरील काही उपाययोजनादेखील सुचविल्या. तर महाराष्ट्राची विशेषतः पुण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या हिंजवडीच्या समस्यांकडे शासन गांभीर्याने कधी पाहणार, असा प्रश्‍नही उपस्थित केला.

हिंजवडीतील आयटी कर्मचारी गोरक्ष गोरे (चिंचवड) यांनी ‘सकाळ’चे कौतुक केले. हिंजवडीतील रस्ते आणि त्यावरील वाहतुकीचा अचूक अभ्यास असणाऱ्या गोरे यांनी वाहतुकीतील बदलांसंदर्भात काही उपाययोजनाही सुचविल्या. या उपाययोजना राबविल्यास येथील वाहतुकीवरील ७० टक्के ताण कमी होण्याची खात्रीही त्यांनी व्यक्त केली. 

वाहतुकीत बदल हाच पर्याय
अभिक श्‍याम म्हणाले, ‘‘येथील वाहतूक कोंडीला सर्वच जण प्रचंड वैतागले आहेत. मात्र, शासनाला आमच्या समस्या सोडविण्यात कोणताही रस नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेकायदा वाहतूक, अत्यंत ढिसाळ सार्वजनिक प्रवासी वाहतूक, अरुंद रस्ते, बेशिस्त वाहनचालक आणि पर्यायी रस्त्यांचा अभाव, असे अनेक घटक याला कारणीभूत आहेत. शेतकरी आणि एमआयडीसीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याने पर्यायी रस्त्यांचा विकास ठप्प आहे. त्यामुळे वाहतुकीतील बदल, हा एकमेव पर्याय आहे. किमान वाहतूक पोलिस यंत्रणेने त्यावर लक्ष केंद्रित करावे.’’ 

गर्दीच्या वेळी नियमन आवश्‍यक
विलास कुटे म्हणाले, ‘‘हिंजवडीतील वाहतूक समस्येवर तत्काळ तोडगा निघणे कठीण आहे. मात्र, यामध्ये वाहतूक पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गर्दीचे चौक, मुख्य रस्त्याला येऊन मिळणारे अंतर्गत रस्ते आदी ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद ठेवून ‘मॅन्युअली’ नियमन केले जावे. मात्र, बऱ्याचदा सर्व वाहतुकीचा भार सिग्नलवर सोडून पोलिस कोठेतरी कोपऱ्यावर कारवाई करताना दिसतात. किमान गर्दीच्या वेळी तरी पोलिसांनी कारवाई टाळून नियमनाला प्राधान्य देणे आवश्‍यक आहे.’’ 

धोकादायक वाहतूक हे दुखणे
सरोजिनी चव्हाण यांनी महामार्गावरील वाहतुकीकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, ‘‘चुकीच्या हिंजवडी पुलाबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, महामार्गावरून धोकादायक पद्धतीने होणारी वाहतूक, हे दुखणे आहे. वाहनचालकच नव्हे, तर पादचारीही सर्रासपणे महामार्गाचा वापर करत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.’’ 

कोट्यवधींचे इंधन जाते व्यर्थ
या कोंडीतून केवळ वेळेचाच अपव्यय नाही, तर लाखो-कोट्यवधी रुपयांचे इंधनही व्यर्थ जात असल्याचे निरीक्षण करमचंद गर्ग यांनी नोंदविले. त्याचे आर्थिक गणितही त्यांनी मांडले. ते म्हणाले, ‘‘फक्त हिंजवडीमध्ये सुमारे एक लाख मोटारी आहेत. प्रत्येक मोटार दररोज किमान दोन तास वाहतूक कोंडीमध्ये अडकते. एक मोटार ताशी ६० किलोमीटर प्रवास करते, असे धरल्यास दिवसाला लाखो लिटर इंधनाचा (एक कोटी रुपयांचा) निव्वळ धूर होतो. पाच हजार बस-ट्रक आणि दोन लाख दुचाकींचा हिशेब केल्यास हा आकडा सात कोटींच्या घरात जातो. त्यातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत कल्पना न केलेलीच बरी. 

रस्ते वाहतुकीसाठी भौगोलिक क्षेत्र किती?
शहराच्या भौगोलिक क्षेत्रापैकी दहा टक्के क्षेत्र तरी रस्ते वाहतुकीस उपलब्ध व्हायला हवे. मुंबईत ते ११.५ टक्के आहे. दिल्लीत १३.५, तर चंडीगडला १८.५ टक्के आहे. हिंजवडीमध्ये ते सहा टक्के तरी आहे का, याचा शोध घेणे आवश्‍यक आहे, असे मत अजय पाटील यांनी व्यक्त केले.