"लोणावळा-पुणे'दरम्यान लोकल कॉरिडॉर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पिंपरी - लोणावळा-पुणेदरम्यान रेल्वेच्या प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या माध्यमातून उपनगरीय कॉरिडॉर विकसित करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. या उपक्रमासाठी रेल्वेला सुमारे 70 हेक्‍टर अतिरिक्‍त जमीन संपादित करावी लागणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. येत्या काही वर्षांमध्ये या प्रस्तावित उपक्रमाच्या कामाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

रेल्वे प्रशासनाने सुरवातीला लोणावळा ते पुणे दरम्यानच्या उपनगरीय रेल्वेसेवेसाठी तिसरा मार्ग टाकण्याचे निश्‍चित केले होते. आता त्यामध्ये चौथा मार्ग टाकण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे लोणावळा पुणे दरम्यानच्या मार्गावर उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर विकसित होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या या उपक्रमाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे सध्या काम हाती घेण्यात आले असून ते पूर्ण होण्यास सहा ते सात महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. प्रकल्प अहवालाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो रेल्वे बोर्ड, नीती आयोग आणि संसदीय समितीकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे अंतिम सर्वेक्षण सुरू होणार आहे. रेल्वेच्या या उपक्रमाला राज्य सरकारही मदत करणार आहे. लोणावळा ते पुणे दरम्यानच्या प्रस्तावित उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरमध्ये तळेगाव, चिंचवड आणि शिवाजीनगर या ठिकाणीचे यार्ड तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाला जोडण्यात येणार आहेत. सध्या या मार्गावर असणाऱ्या दोन मार्गांवरून मालगाडी, एक्‍स्प्रेस गाड्या चालवण्याचे नियोजन आहे. ज्यावेळेस आवश्‍यकता असेल त्यावेळेस तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा वापर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

चौथ्या मार्गासाठी पन्नास हेक्‍टरची गरज 
प्रस्तावित तिसरा आणि चौथा मार्ग करण्यासाठी रेल्वेला सुमारे 138 हेक्‍टर जमिनीची आवश्‍यकता आहे. सध्या रेल्वेकडे त्यापैकी तिसऱ्या मार्गासाठी 48 हेक्‍टर आणि चौथ्या मार्गासाठी 19 हेक्‍टर जागा उपलब्ध आहे. या दोन्ही मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वेला 70 हेक्‍टर जागेचे भूसंपादन करावे लागणार असून त्यापैकी सुमारे 50 हेक्‍टर जागा चौथ्या मार्गासाठी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.