"जीवनवाहिनी'ला हवी ट्रॅकची नवसंजीवनी 

"जीवनवाहिनी'ला हवी ट्रॅकची नवसंजीवनी 

वडगाव मावळ - पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी प्रस्तावित तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या कामाला गती देण्याची आवश्‍यकता आहे. 

प्रवाशांमध्ये असंतोष 
रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपासून पुणे ते लोणावळादरम्यानच्या लोकल फेऱ्यांमध्ये कपात केल्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष आहे. तसेच, प्रलंबित मागण्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

लोकलवर अवलंबून घटक 
मावळ तालुक्‍यातील नोकरदार, कर्मचारी, व्यापारी, छोटे व्यावसायिक, दुग्धव्यावसायिक, शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, पर्यटक अशा सर्वच घटकांची "लोकल' ही जीवनवाहिनी म्हणून परिचित आहे. 

प्रवासी वाढण्याची कारणे 
गेल्या काही वर्षांत तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर झालेले औद्योगीकरण व त्या अनुषंगाने वाढलेले नागरीकरण यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत असून, लोकलच्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. 

अर्ध्या तासाला हवी लोकल 
मागण्या पूर्ण कराव्यात. वाढत्या प्रवाशांसाठी लोकलची तत्पर सेवा व रेल्वे स्थानकांवर सुविधा पुरविण्याची रेल्वे प्रवासी संघाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यात प्रामुख्याने लोकलच्या फेऱ्या वाढवून ही सेवा दर अर्ध्या तासाला मिळावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. 

रेल्वेच्या मर्यादा व परिणाम 
पुणे-लोणावळादरम्यान सध्या दोनच रेल्वे ट्रॅक असून, त्यावरून लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकलची ये-जा सुरू आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास रेल्वे प्रशासनाला मर्यादा येत आहेत. फास्ट गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. फास्ट गाड्यांसाठी व लोकलसाठी स्वतंत्र ट्रॅकची गरज आहे. 

गेल्या अर्थसंकल्पात तरतूद 
रेल्वे मंत्रालयाकडून गेल्या सात आठ वर्षांपासून तिसऱ्या ट्रॅकची चर्चा सुरू आहे. गेल्या अर्थसंकल्पात तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे सर्वेक्षण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. त्याची कार्यवाही प्रशासनाने केली आहे. आता प्रत्यक्ष कार्यवाहीची प्रवाशांना प्रतीक्षा आहे. 

रेल्वे प्रशासनाची कसरत 
तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचे काम सुरू करण्यासाठी मावळ तालुक्‍यात देहूरोड ते लोणावळादरम्यान रेल्वे प्रशासनाला अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे. त्यात प्रशासनाची कसोटी लागणार आहे. 

स्वतंत्र ट्रॅकचे अडथळे 
- देहूरोड ते कामशेतदरम्यान वाढलेले नागरीकरण 
- देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव, कान्हे, कामशेत, लोणावळा येथे लोहमार्गालगत मोठ्या नागरी वस्त्या 
- घोरावाडी व बेगडेवाडीदरम्यान भूसंपादनासाठी संरक्षण खात्याची परवानगी लागणार 
- कामशेत येथे एका बाजूला नदी, तर दुसऱ्या बाजूला बाजारपेठ 
- तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकसाठी भूसंपादन हा कळीचा मुद्दा ठरणार 

नवीन ट्रॅक गरजेचाच 
तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकला अडथळा ठरणाऱ्या नागरी वस्त्यांच्या पुनर्वसनासाठी रेल्वे मंत्रालय काही योजना आखणार का? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. परंतु, तिसरा व चौथा ट्रॅक ही काळाची गरज असून, सर्व घटकांचे समाधान व समन्वय साधून हा प्रश्‍न मार्गी लावावा लागणार आहे. 

तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचा प्रकल्प मार्गी लागल्याशिवाय लोकलच्या फेऱ्या वाढणार नाहीत व प्रवाशांना जलद सेवा मिळणार नाही. दिवसेंदिवस प्रवासी संख्याही वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून हा प्रकल्प मार्गी लावावा. 
- पोपटराव भेगडे, अध्यक्ष, मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com