मुस्लिमांचा "मानवता बचाव' मूक मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पिंपरी - म्यानमारमधील रोंहिग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध पिंपरी चिंचवड शहरातील हजारो मुस्लिम धर्मीयांनी शुक्रवारी (ता. 15) मानवता बचाव मूक मोर्चा काढला. 

पिंपरी - म्यानमारमधील रोंहिग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध पिंपरी चिंचवड शहरातील हजारो मुस्लिम धर्मीयांनी शुक्रवारी (ता. 15) मानवता बचाव मूक मोर्चा काढला. 

नमाज अदा केल्यावर मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मौलवींनी केले होते. त्याला प्रतिसाद देत मुस्लिम धर्मीय मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. भीमनगर येथील मशिदीपासून दुपारी एक वाजता काढण्यात आलेला हा मोर्चा मिलिंदनगर, भाटनगर, लिंक रोड, मोरवाडी मार्गे पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात धडकला. यानंतर डॉ. आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी अनेक मौलवींनी भाषणे केली. या मोर्चात सुमारे दहा हजार जण सहभागी झाले होते. 

मौलवी म्हणाले, ""पत्रकार गौरी लंकेश, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घ्यावा. रोहिंग्या मुस्लिमांना नागरिकत्व द्यावे. तसेच या मुस्लिमांचा खून करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात संयुक्त राष्ट्रांमधील न्यायालयात याचिका दाखल करा. अशा हत्या व अत्याचाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात येत असून, भारत सरकारने रोहिंग्या समाजावर होत असलेले अत्याचार थांबविण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावर प्रयत्न करावा. मान्यमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांचा नोबल पुरस्कार काढून द्यावा.''