निगडी-देहूरोड प्रवास सुरक्षित

निगडी-देहूरोड प्रवास सुरक्षित

देहूरोड - रस्ते विकास महामंडळातर्फे पुणे-मुंबई महामार्गाचे निगडी ते देहूरोडदरम्यान चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निगडी दिशेला देहू फाटा ते एमईएस पंप हाउसदरम्यान काही ठिकाणचा अपवाद वगळता चारही लेनचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या लेनवरून वाहतूक वळविल्याने महामार्गावरील सुरक्षितता वाढली आहे. परिणामी संभाव्य अपघातांची शक्‍यताही कमी झाली आहे. 

वर्षांनुवर्षाचा तिढा सुटला
पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते देहूरोड हा केवळ पाच किलोमीटरचा रस्ता अरुंद होता. लष्कराची परवानगी मिळत नसल्याने अनेक वर्षांपासून त्यांचे रुंदीकरण रखडले होते. अरुंद रस्त्यामुळे अपघात होत होते. त्यात दुचाकीस्वारांच्या बळींची संख्या मोठी होती. यामुळे हा भाग महामार्गाचा ‘ब्लॅक पॅच’ म्हणून ओळखला जात होता. असंख्य दुचाकीस्वारांचे बळी घेणाऱ्या या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी देहूरोड परिसरातील नागरिकांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने दिली. त्यासाठी ‘रास्ता-रोको’ आंदोलने केली. मात्र, लष्कराच्या हद्दीमुळे राज्य सरकारला कोणताही निर्णय घेता येत नव्हता. 

देहूरोडमध्ये जनसुविधा केंद्र
राज्यातील महामार्गांवर राज्य सरकार पन्नास जनसुविधा केंद्र उभारणार आहे. त्यातील पहिले जनसुविधा केंद्र देहूरोडमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यात महिला व पुरुषांसाठी उपाहारगृह व स्वच्छतागृह असेल.

पूर्ण झालेली कामे
गार्डन सिटी, सीक्‍यूएएसव्ही, केंद्रीय विद्यालय, अलकापुरी प्रवेशद्वार, २९ फिल्ड ॲम्युनिशन डेपो, कॅंटोन्मेंट नाका, एमईएस पंप हाउस आणि परमार कॉम्प्लेक्‍स परिसर. या दरम्यान मार्गाच्या दोन्ही बाजूला काही ठिकाणचा अपवाद वगळता डांबरीकरण झालेले आहे. त्यामुळे यापूर्वी जुन्या दुपदरी खड्डेमय रस्त्याने धुळीतून मार्ग काढीत ये-जा करणारी वाहने आता नव्या रस्त्यावरून धावू लागली आहेत. दरम्यान, सेंट्रलच्या दिशेलाही दोन्ही बाजूच्या लेनचे कामही सुरू आहेत.

येथे घ्यावी काळजी
 निगडीजवळ तीन मोठे रेस्टॉरंट, बिअरबारमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे महामार्गावरील वाहतुकीस ब्रेक
 देहूरोड बाजूला कॅंटोन्मेंट नाक्‍यासमोरील नागमोडी वळण
 देहू फाटा, रेल्वे पुलाचा उतार, बॅंक ऑफ इंडिया चौक, स्वामी विवेकानंद चौक, कॅंटोन्मेंटच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयासमोरील वळण, गुरुद्वारा ते सेंट ज्यूड शाळा

वाहनचालकांना उपयुक्त सूचना
 अपघाती ठिकाणांच्या परिसरात वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे
 उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने सावधपणे वाहने चालवावित

अनेक वर्षांपासून संरक्षण विभागाच्या परवानगीअभावी निगडी-देहूरोड रस्त्याचे रुंदीकरण रखडले होते. दोन वर्षांपासून पाठपुरावा करून संरक्षण विभागाची परवानगी घेतली. देहूरोड कॅन्टोंन्मेंट बोर्डाने सहकार्य केले. राज्य सरकारने देहूरोडमधील पुलासह रस्ता रुंदीकरणासाठी ८५ कोटी मंजूर केले आहे. दरम्यान, वृक्ष प्राधिकरणाने विरोध केला होता. रुंदीकरणामुळे बाधित झाडांचे पुनर्रोपणाबाबत विश्‍वासात घेतल्याने त्यांनीही मान्यता दिली. त्यानंतर रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. येत्या ३१ मे २०१८ पर्यंत निगडी ते देहूरोड चौपदरीकरण आणि उड्डाण पूल लोकार्पण करण्यात येईल. तसेच किवळे आणि चिंचोलीत जाण्यासाठी ‘सबवे’ केला जाईल. रस्ता रुंदीकरणाच्या कामात देहूरोडमधील नागरिकांनी विरोध न करता सहकार्याची भूमिका घेतल्याने त्यांचे विशेष आभार मानायला हवेत. 
बाळा भेगडे, आमदार

महामंडळाच्या अंतर्गत पीबीए इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडमार्फत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत ७० टक्के काम मार्गी लागले आहे. उर्वरित कामही वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.  
रणजित काकडे, संचालक, पीबीए इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड

खराब रस्ता आणि दुतर्फा सुरू असलेल्या कामामुळे निगडी- देहूरोडदरम्यान महिला दुचाकीस्वारांना अपघाताची भीती वाटायची. जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत होती. ही भीती काम पूर्ण झालेल्या लेनमुळे दूर झाली आहे; मात्र मार्गात लोहमार्गावरील पूल आणि निगडीदरम्यान कुठेच पथदिवे नसल्याने रात्री अपघातांची टांगती तलवार आहेच. त्यामुळे मार्गावर पथदिवे तातडीने बसवावेत. 
छाया गोसावी, दुचाकीस्वार महिला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com