बचत गटांना शून्य टक्‍के व्याजाने कर्ज शक्‍य 

बचत गटांना शून्य टक्‍के व्याजाने कर्ज शक्‍य 

नवी सांगवी - एकीकडे मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या दिवाळखोरीत निघत असताना दुसरीकडे महिलांचे बचत गट मात्र, उभारी घेताना दिसत आहेत. कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे व नियमितपणे होत आहे, हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळेच भविष्यात बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध होऊ शकेल, असे प्रतिपादन ऍक्‍सिस बॅंकेच्या उपमुख्य कार्यकारी अध्यक्षा (पश्‍चिम विभाग) अमृता फडणवीस यांनी केले. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 4) झाले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर,  डॉ. वैशाली घोडेकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, माई ढोरे व नगरसेवक उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाल्या, "स्त्रियांमध्ये उपजतच वाखाणण्याजोगे गुण असतात; परंतु त्यांना त्यासाठी योग्य दिशा देण्याची गरज आहे. शिक्षण आणि स्वावलंबनातून ते सहज शक्‍य आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला घर सांभाळून कुटुंबाचा आर्थिक भारही उचलू शकतात. यामुळे त्यांचे कुटुंब तर सुधारण्याबरोबरच देश महासत्ता होण्यास हातभार लागेल. 

पालकमंत्री बापट म्हणाले, पोळी-भाजी अथवा कांदेपोह्यापुरते बचत गटांचे काम राहिलेले नाही. नवीन संकल्पना, उद्योगांचा आता समावेश होत आहे. अंगणवाडी सेविकाही चांगले कार्य करत आहेत. उद्योगनगरी असलेल्या या पिंपरी चिंचवडमध्ये लघुउद्योगही बचत गटांच्या माध्यमातून कसे चालतील, याकडे बघितले पाहिजे. राज्य सरकारही महिलांना केंद्रबिंदू मानून त्यांना प्रोत्साहन देत आहे. 

सीएमसाहेबांकडे वशिला 
पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी राज्य सरकारची मदत कमी पडत असेल तर आपण अमृताताईंचा वशिला सीएम साहेबांकडे लावू, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या भाषणात म्हटले. तोच धागा पकडून फडणवीस यांनी सांगितले की, शहराच्या विकासासाठी मीही देवेंद्रजींच्या मागे लागेन. या वाक्‍यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. 

अमोघ वक्‍तृत्व 
राज्यस्तरीय टेनिसपटू, शास्त्रीय गायिका असलेल्या अमृता फडणवीस यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमवेत एक संगीत अल्बमही केला आहे. लवकरच तो रसिक श्रोत्यांसाठी येत आहे. बॅंक आणि अर्थविषयक जाणकार, असे अष्टपैलू व्यक्‍तिमत्त्व लाभलेल्या अमृताजींनी वाक्‌चातुर्याने सांगवीकरांची मने जिंकून स्वतःचा आणखी एक पैलू दाखवून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com