‘पवना’तून २७४६ क्‍युसेकने विसर्ग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

पवनानगर - पवना धरण ९५ टक्के भरले आहे. सहापैकी चार दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. सांडव्यातून १३५२, तर हायड्रो पॉवर आउटलेटद्वारे १३९४ असा एकूण २७४६ क्‍युसेकने पवना नदीत विसर्ग सुरू केला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एन. एम. मठकरी यांनी दिली.

मावळसह पिंपरी-चिंचवडकरांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पवना धरण परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. धरण ९५.२७ टक्के भरले. गेल्या सोमवारपासून हायड्रो पॉवर आउटलेटद्वारे १३९४ क्‍युसेक या वेगाने पाणी नदीत सोडण्यात येत आहे; परंतु, पावसाचा जोर कायम असल्याने धरणाची पाणी पातळी वाढतच आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता धरणाच्या सांडव्यातून १३५२ क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  गेल्या वर्षी पवना धरणात ६० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. पाच ऑगस्ट रोजी विसर्ग सुरू करण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आठ दिवस अगोदरच धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू करावा लागला आहे. एक जूनपासून आजपर्यंत २१९२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा ८.१० टीएमसी आहे. त्यामुळे मावळ व पिंपरी-चिंचवड शहरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न वर्षभरासाठी सुटला आहे.

Web Title: pimpri news Pawna Dam water