हक्‍कासाठी लढणाऱ्याची आश्‍वासनांवर बोळवण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

पिंपरी - महापालिकेच्या सर्व नियमांमध्ये बसूनही वशिल्याच्या उमेदवारासाठी एका प्रामाणिक तरुणास महापालिकेने नोकरीतून डावलले. पुराव्यासह हा प्रकार त्या तरुणाने उघडकीस आणला. नोकरीसाठी तो दररोज महापालिकेत चकरा मारत असून, आयुक्‍तांपासून ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण त्याची फक्‍त आश्‍वासनांवर बोळवण करीत आहेत. 

पिंपरी - महापालिकेच्या सर्व नियमांमध्ये बसूनही वशिल्याच्या उमेदवारासाठी एका प्रामाणिक तरुणास महापालिकेने नोकरीतून डावलले. पुराव्यासह हा प्रकार त्या तरुणाने उघडकीस आणला. नोकरीसाठी तो दररोज महापालिकेत चकरा मारत असून, आयुक्‍तांपासून ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण त्याची फक्‍त आश्‍वासनांवर बोळवण करीत आहेत. 

महापालिकेने 21 जुलै रोजी प्राणीमित्रांच्या सहा जागांसाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले. या मुलाखतीमध्ये भोसरीतील तरुण राजू कदम यांच्याकडे महापालिकेत तीन वेळा काम केल्याचा अनुभव, वनविभागाचे ओळखपत्र; तसेच इतर सर्व आवश्‍यक कागदपत्रे होती. मात्र निवड समितीच्या काही सदस्यांनी कदम यांना जाणीवपूर्वक गुण कमी दिले; तसेच महापालिकेने निवड केलेल्या उमेदवाराकडून प्रात्यक्षिक करून घेतले नाही. यामुळे कागदोपत्री निवड केलेल्या उमेदवारांना प्रत्यक्षात काम येते का नाही, याबाबतही जाणून घेतले नाही. 

निवड प्रक्रियेबाबत यापूर्वी अतिरिक्‍त आयुक्‍त अच्युत हांगे यांना विचारले असता, एमपीएससी परीक्षेप्रमाणे ही भरती अगदी पारदर्शी झाल्याचे सांगितले होते. कदम यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याशी संपर्क साधत निवड प्रक्रियेत आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पुराव्यासह भांडाफोड केला. यामुळे आमदार लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर अधिकाऱ्यांना आपली चूक लक्षात आली. "आपण त्या तरुणाला कामावर घेतो,' असे आश्‍वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी आमदार लांडगे यांना दिले. कदम यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडेही दाद मागितली. तीन महिन्यांनंतरही महापालिकेचे अधिकारी या तरुणाला "तुझे काम करतो. आज ये-उद्या ये' असे म्हणत तीन महिने फक्‍त आश्‍वासनावर बोळवण करीत आहेत. 

प्राणीमित्र भरतीबाबत माझ्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची मी चौकशी करीत असून, संबंधित फाइल मागविली आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्‍त, महापालिका