महापौरांच्या दाखल्यावर तीन ऑगस्टला सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

पिंपरी - महापौर नितीन काळजे यांच्या कुणबी जात दाखल्याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या दक्षता पथकाने त्यांना ‘क्‍लीन चिट’ देणारा अहवाल दिला आहे. ज्या मूळ कागदपत्रांच्या आधारे हा अहवाल दिला, ती कागदपत्रे द्यावी. संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतरच याबाबत पुढील भूमिका मांडता येईल, असा युक्तिवाद तक्रारदार घनश्‍याम खेडकर यांच्या वकिलाने बुधवारी समितीसमोर झालेल्या सुनावणीत केला. त्यामुळे आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी तीन ऑगस्टला होणार आहे.

महापौर काळजे यांच्या कुणबी जातीच्या दाखल्याबाबत घनश्‍याम खेडेकर यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार केलेली आहे. समितीने काळजे यांना २० तारखेला कारणे दाखवा नोटीस बजावली. बुधवारी (ता. २६) येरवडा येथील कार्यालयात होणाऱ्या सुनावणीस हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार काळजे सुनावणीला हजर होते. समितीच्या दक्षता पथकाचे चौकशी अधिकारी एस. डी. घार्गे यांनी काळजे यांच्या कुणबी जात दाखल्याबाबत यापूर्वी ‘क्‍लीन चिट’ दिली आहे. तसा अहवालदेखील त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केला. मात्र, हा अहवाल समितीने नाकारला.  काळजे यांनी सादर केलेल्या स्वतःच्या व वडिलांच्या शालेय दाखल्यात जातीची नोंद मराठा आहे. मराठा व कुणबी या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत. त्याशिवाय, त्यांनी सादर केलेल्या जन्म-मृत्यू नोंद पुराव्यातील पुरावाधारकांशी त्यांचे नातेसंबंध सिद्ध होत नसल्याचा निष्कर्ष जात पडताळणी समितीने काढला होता. तसेच, काळजे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून त्यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध का ठरवू नये, याचा खुलासा सादर करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 

दक्षता पथकाने ज्या मूळ कागदपत्रांच्या आधारे अहवाल तयार केला, ती कागदपत्रे आम्ही मागितली आहेत. त्यांची पडताळणी केल्यानंतरच आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत.
- ॲड. गणेश भुजबळ, तक्रारदाराचे वकील.

जात पडताळणी समितीकडे कुणबी जातीच्या दाखल्याबाबत मी यापूर्वी पुरावे दिले आहेत. वंशावळीचे १५ ते १६ पुरावे जोडले आहेत. महसुली पुरावा, शालेय दाखला, जन्म नोंद पुरावा आदींचाही त्यात समावेश आहे.
- नितीन काळजे, महापौर