'ब्लॅकमेलिंग करणारेच आता कारभारी'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या एकनाथ पवार यांना मी याही आगोदर कायदेशीर नोटीस बजावली असून, माझ्यावर व्यक्तिगत केलेल्या आरोपाबद्दल अब्रूनुकसानीचा दावाही दाखल करू.
- खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी - ज्यांचे आयुष्य ‘ब्लॅकमेलिंग’ करण्यात गेले, त्यांच्या हातून चांगला कारभार कसा होणार, असा रोखठोक सवाल करत खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपचे सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादीने केलेल्या चुका, सामान्यांच्या मूलभूत प्रश्‍नांकडे केलेले दुर्लक्ष आणि मोदी लाटेमुळे भाजपच्या त्रिकुटाला सत्ता मिळाल्याची टीकाही केली.

महापालिकेत सत्तेत येऊन भाजपला सहा महिने झाले. नागरिकांच्या असंख्य तक्रारी येऊ लागल्याने बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन समस्यांचा पाढा वाचला. कचरा, पाणी, आरोग्य अशा अनेक समस्या मांडल्या. शहरभर तक्रारी वाढल्याची कबुली आयुक्तांनी दिली. याची मिरची झोंबलेल्या एकनाथ पवार यांनी आपल्यावर खालच्या भाषेने टीका केली, ती भाजपसारख्या सुसंस्कृत पक्षाला शोभणारी नाही, असे बारणे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, ‘‘नागरिकांच्या समस्यांपासून लक्ष विचलित व्हावे, म्हणून खालच्या भाषेत आपण टीका केली; पण खुद्द आयुक्तांनी शहरात कचरा, पाणी, सांडपाणी या तक्रारी वाढल्याची कबुली दिली. एकनाथ पवार त्रिकुटाला महापालिकेचा कारभार करता येत नसल्याचे गेल्या सहा महिन्यांत सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेऊन जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला. हे विसरू नये शहराचा एवढा कचरा करून ठेवला आहे, तो साफ करण्यासाठी शहरातील जनतेलाच आपण झाडू हातात घेण्यास भाग पाडले. त्याच झाडूने एक दिवस शहरातील जनता तुम्हाला साफ करेल. तुमचा कारभार फक्त पत्रकबाजीवर सुरू असून तो सुधारण्याचे सोडून दुसऱ्यांवर टीका करण्यातच तुम्ही धन्यता मानत आहात.’’ टीका करून कारभाराची पाठ बडवून घ्यावी, असे वाटत असल्यास दररोज पत्रक काढून टीका करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ना घंटागाडी वेळेवर येते, ना कचरा उचलला जातो. सहा महिन्यांत सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण शहराचा कचरा केला आहे. पवना धरण शंभर टक्के भरूनही भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.