शहरात ११ ‘ब्लॅकस्पॉट’

सुधीर साबळे
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

पिंपरी - रस्त्यावर एखाद्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतील, तर त्या ठिकाणी निश्‍चितपणे काहीतरी दोष असतो. मात्र, महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने त्या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अशी ११ अपघात प्रवण (ब्लॅकस्पॉट) क्षेत्र आढळले आहेत. चार वर्षांत त्या ठिकाणी १०१ गंभीर अपघात घडले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३१ अपघात वाकड पुलानजीक झाले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाला सादर केला असून, तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

पिंपरी - रस्त्यावर एखाद्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतील, तर त्या ठिकाणी निश्‍चितपणे काहीतरी दोष असतो. मात्र, महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने त्या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अशी ११ अपघात प्रवण (ब्लॅकस्पॉट) क्षेत्र आढळले आहेत. चार वर्षांत त्या ठिकाणी १०१ गंभीर अपघात घडले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३१ अपघात वाकड पुलानजीक झाले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाला सादर केला असून, तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ‘ब्लॅकस्पॉट’ नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील ब्लॅकस्पॉटची माहिती महापालिका प्रशासन, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना दिली आहे. संबंधित यंत्रणांनी या ठिकाणांना भेटी देऊन आवश्‍यक उपाययोजना केल्यास अपघात रोखता येतील.
- विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग (नियोजन) 

महापालिका म्हणते ‘माहितीच नाही’
पंधरा दिवसांपूर्वी परिवहन विभागाने एक बैठक आयोजित केली होती. त्यात शहरातील अपघात प्रवण क्षेत्रांबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र, महापालिका आयुक्‍तांपासून शहर अभियंत्यांकडे ‘ब्लॅकस्पॉट’ संदर्भात चौकशी केली असता, या संदर्भात माहिती नसल्याचे उत्तर मिळाले. यावरून अपघात प्रवण क्षेत्रांबाबत महापालिका किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.

येथेही उपाययोजना हव्यात
भोसरीमधील धावडे वस्ती, दापोडीतील सीएमई चौक, औंध हॉस्पिटल, बालेवाडी स्टेडियम या अपघात प्रवणक्षेत्रावर अशाच प्रकारच्या समस्या आहेत. महापालिकेने या जागांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी सुधारणा केल्यास या भागातील अपघातांचे प्रमाण कमी होईल. 

अपघाती क्षेत्रनिहाय २०१४ ते २०१७ दरम्यान झालेले अपघात
अपघाती क्षेत्र       संख्या

औंध हॉस्पिटलजवळ       ६
विशालनगर       ५
जगताप डेअरी चौक       ८
बालेवाडी स्टेडिअम       ९
वाकड पूल       ३१
पुनावळे पूल       १२
भूमकर चौक       ७
भक्‍ती-शक्‍ती चौक       ७
धावडे वस्ती       ५
नाशिक फाटा       ६
सीएमई गेटजवळ       ५

वाकड पूल  - समस्या
दोन्ही सेवा रस्त्यांवरून वाहने उलट्या दिशेने घुसतात
महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी मार्गाचा अभाव
पुणे- मुंबईकडे जाणारी वाहने प्रवासी घेण्यासाठी थांबतात
महामार्ग व सेवा रस्ता यामध्येच वाहने थांबतात

उपाययोजना 
सेवा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सिग्नल यंत्रणा सुरू करावी
मुख्य रस्त्यावर थांबणाऱ्या बसगाड्यांना अधिकृत थांबा द्यावा
पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी 

भूमकर चौक - समस्या
हिंजवडी आयटी पार्ककडे जाण्यासाठी मोठी वर्दळ
चौकातील सिग्नल यंत्रणा बंद
अरुंद रस्ता आणि सतत जड वाहनांची वाहतूक
शाळा, महाविद्यालयांची संख्या अधिक असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ

उपाययोजना 
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दुभाजकाची आवश्‍यकता
अरुंद रस्त्यामुळे अनेक प्रश्‍न, रस्ता रुंदीकरणाची गरज

नाशिक फाटा - समस्या
सिग्नल यंत्रणा असूनही एकाच वेळेस तिन्ही बाजूंनी वाहने येतात
सेवा रस्त्याकडे वळताना मध्येच थांबलेल्या वाहनांचा अडथळा

उपाययोजना 
वाहतुकीच्या नियोजनासाठी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी
रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची गरज

भक्‍ती-शक्‍ती चौक - समस्या
उड्डाण पूल व ग्रेडसेपरेटचे काम सुरू असल्याने इथला रस्ता अरुंद
अनधिकृत हातगाड्यांचे अतिक्रमण, रस्त्याचा अर्धा भाग व्यापलेला
चौकात एका बाजूस वाहनतळ असल्याने अपघातात भर
अवजड वाहनांची मोठी रहदारी असल्याने सातत्याने कोंडी

उपाययोजना 
चौकातील सिग्नल यंत्रणेचे सुसूत्रीकरण करण्याची आवश्‍यकता
अनधिकृत अतिक्रमणे महापालिकेने काढल्यास परिसर मोकळा होईल
वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी स्पीडब्रेकरची आवश्‍यकता
रस्त्यावरील पार्किंग पूर्णपणे बंद केल्यास अडचणी कमी होतील

पुनावळे पूल - समस्या
मुख्य रस्त्यालगतच्या सेवा रस्त्याची अवस्था खराब
येथील तिन्ही रस्त्यांवरून एकाच ठिकाणी वाहने येतात
दिव्यांची सुविधा नसल्याने अपघाताला निमंत्रण 
रस्त्याच्या एका बाजूला तीव्र उतार

उपाययोजना 
पथदिवे लावण्याची आवश्‍यकता 
वेगमर्यादा नियंत्रित ठेवण्यासाठी स्पीडब्रेकरची आवश्‍यकता 
वाहनांच्या सुरक्षेसाठी रस्त्याची स्थिती सुधारण्याची गरज

अपघाताची कारणे?
वेगमर्यादेचे उल्लंघन
अरुंद रस्ते 
उपाययोजनांचा अभाव

चार वर्षांत १०१ अपघात
वाहतूक पोलिसांचा अहवालात निष्कर्ष
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
उपाययोजनांची तातडीने गरज

Web Title: pimpri news pune news traffic