राजकीय दबावाखाली डॉक्‍टरांचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पिंपरी - खासगी रुग्णालयात तज्ज्ञांना दरमहा दीड लाख, तर वायसीएममध्ये अवघे 60 हजार रुपये वेतन मिळते. अनेकदा राजकीय व्यक्‍ती आणि वरिष्ठांकडून कामात हस्तक्षेप केला जातो. वारंवार दबाव आणला जातो. टर्मिनेट करण्याची धमकी दिली जाते. अपमानास्पद वागणूक मिळते. याचा डॉक्‍टरांना मानसिक त्रास होत असून, रुजू झाल्यानंतर अनेकांनी काही महिन्यांतच वायसीएमला "रामराम' ठोकला आहे. 

पिंपरी - खासगी रुग्णालयात तज्ज्ञांना दरमहा दीड लाख, तर वायसीएममध्ये अवघे 60 हजार रुपये वेतन मिळते. अनेकदा राजकीय व्यक्‍ती आणि वरिष्ठांकडून कामात हस्तक्षेप केला जातो. वारंवार दबाव आणला जातो. टर्मिनेट करण्याची धमकी दिली जाते. अपमानास्पद वागणूक मिळते. याचा डॉक्‍टरांना मानसिक त्रास होत असून, रुजू झाल्यानंतर अनेकांनी काही महिन्यांतच वायसीएमला "रामराम' ठोकला आहे. 

राजकीय दबाव 
हाणामारीच्या घटनेतील रुग्णांना अनेकदा आवश्‍यकता नसतानाही राजकीय दबावामुळे आयसीयूमध्ये ऍडमिट करण्यास भाग पाडले जाते. यामुळे केस स्ट्रॉंग होते, असे राजकीय व्यक्‍तींना वाटते. याशिवाय वशिल्याच्या रुग्णांना प्रथम प्राधान्य देण्यासाठीही दबाव टाकला जातो. उच्चशिक्षित डॉक्‍टरांना अनेकदा राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते अरे-तुरेच्या भाषेत बोलतात. अपशब्दही वापरतात. राजकीय नेत्यांशी जवळीक असलेले काही जण आपल्या नातेवाइकांना उपचारासाठी गावाहून वायसीएम रुग्णालयात आणतात. त्यांची बिले माफ करण्यासाठीही दबाव आणला जातो. खुर्ची टिकविण्यासाठी वरिष्ठ डॉक्‍टरही असे दबाव निमूटपणे सहन करतात. 

डॉक्‍टरांनाच सल्ला 
अपघातातील रुग्णाच्या डोक्‍याला मार लागल्याने सीटीस्कॅन करण्याचे एका डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या राजकीय पुढाऱ्याच्या कार्यकर्त्याने "कशाला हवे स्कॅन?, एक्‍स-रेवर काम भागवा' असे सांगत डॉक्‍टरांनाच सल्ला दिला. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली. मात्र, त्याबाबत निर्णय न घेता त्या डॉक्‍टरला एक्‍स-रेवरच भागविण्याचा सल्ला वरिष्ठांनी दिल्याचे समजते. 

डॉक्‍टरांची स्वेच्छानिवृत्ती 
महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील वरिष्ठ डॉक्‍टरांमध्ये दुफळी आहे. सुधारणेसाठी एखाद्या डॉक्‍टरने सूचना केल्यास तो विरोधी गटाचा आहे, असे समजून त्यास मानसिक त्रास दिला जातो. त्याला कंटाळून गेल्या दोन वर्षांत अनेकांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली आहे. आपल्या पेन्शनमध्ये अडचण नको म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती देताना घरगुती कारण सांगितले. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या नामांकित डॉक्‍टरांच्या यादीत नितीन गायकवाड (चेस्ट), डॉ. वैशाली रोकडे (चेस्ट फिजिशियन आयसीयू स्पेशालिस्ट), एलिझाबेथ थॉमस (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. मीनाक्षी पाटील (बालरोग), डॉ. उमा पारधी (नेत्र), मुग्धा मार्कंडेय यांचा समावेश आहे. आता महापालिकेत "पे-रोल'वर असलेले वायसीएममधील एकमेव फिजिशियन डॉ. किशोर खिलारी यांनीही स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. 

कधी सुटेल डॉक्‍टरांचा प्रश्‍न? 
वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू होणार आहे. गेल्यावर्षी केंद्र सरकारने अभ्यासक्रमाला मंजुरी दिली आहे. मात्र, अर्ज आणि शुल्क वेळेत न भरल्याने हा अभ्यासक्रम वर्षभर लांबणीवर पडला आहे. पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यावर हा प्रश्‍न मार्गी लागेल आणि रुग्णसंख्येत श्रीमंत असलेले वायसीएम रुग्णालय डॉक्‍टरांच्या बाबतीतही श्रीमंत होईल. मात्र, त्यास राजकीय इच्छाशक्‍तीची गरज आहे.