वायसीएम रुग्णालयात एकाच खाटेवर दोन दोन रुग्ण 

संदीप घिसे
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

पिंपरी - वायसीएम रुग्णालयात डॉक्‍टरांची संख्या कमी असली तरी रुग्णांची संख्या अधिक आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी खाटाच शिल्लक नसल्याने एकाच खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात येत आहे. सध्या स्वाइन फ्लूसारख्या साथीच्या रोगांच्या रुग्णांची संख्या जादा असल्याने इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयातील या स्थितीकडे वायसीएम प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. 

पिंपरी - वायसीएम रुग्णालयात डॉक्‍टरांची संख्या कमी असली तरी रुग्णांची संख्या अधिक आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी खाटाच शिल्लक नसल्याने एकाच खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात येत आहे. सध्या स्वाइन फ्लूसारख्या साथीच्या रोगांच्या रुग्णांची संख्या जादा असल्याने इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयातील या स्थितीकडे वायसीएम प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. 

वायसीएम हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय म्हणून ओळखले जाते. सध्या या रुग्णालयाची क्षमता 750 खाटा इतकी आहे. प्रत्यक्षात रुग्णालयात 850 रुग्णांवर उपचार होत असल्याचे समजते. सध्या साथीचे आजार सुरू असल्याने वायसीएम रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्यांची संख्या जादा आहे. यामुळे मेडिसीन, सर्जरी या विभागाचा बाह्यरुग्ण विभाग दुपारी चारपर्यंत चालतो. तातडीच्या विभागातील रुग्णांची संख्या जादा असल्याने एकाच खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात येते. सध्या स्वाइन फ्लूची साथ जोरदार असल्याने संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

बिलिंगसाठी उशीर 
डॉक्‍टरांकडून डिस्चार्ज देण्याचे निश्‍चित झाल्यावर वॉर्डातून संबंधित रुग्णाची कागदपत्रे बिलिंग विभागाकडे पाठविली जातात. ही बिले येण्यासाठी सायंकाळ होते. कधी-कधी पैसे भरण्याची खिडकी बंद झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन बिल करून पाठविले जाते. जोपर्यंत डिस्चार्ज मिळालेला रुग्ण जात नाही, तोपर्यंत नवीन रुग्णांना वॉर्डात प्रवेश मिळत नाही. यामुळे तातडीक विभागात एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्याची गरज पडते. 

सीएमओंची दुकानदारी 
सीएमओपदी किमान पाच वर्षांचा अनुभव असणाऱ्या डॉक्‍टरांची नियुक्‍ती करणे आवश्‍यक आहे. मात्र एमबीबीएस झालेल्या डॉक्‍टरांनाही सीएमओपदी नियुक्‍ती दिली जाते. रुग्णालयात येणाऱ्या गंभीर रुग्णांना आयसीयूची गरज असल्याचे काही सीएमओंकडून नातेवाइकांना सांगितले जाते. मात्र सध्या वायसीएम रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये जागा नसल्याचे सांगून सदर रुग्णास खासगी रुग्णालयाच्या आयसीयूत पाठविले जाते. यातून त्यांना कमिशनपोटी चांगली कमाई मिळत असली तरी ऐपत नसतानाही नाइलाजास्तव भीतीपोटी नातेवाइकांना खासगी रुग्णालयाचा भुर्दंड सोसावा लागतो. 

वायसीएममधील रुग्णांची आकडेवारी 
वर्ष रुग्ण 
2014-15 34,577 
2015-16 34,045 
2016-17 36,626