ना पाटी, ना खडू हाती पोछा नि झाडू

ना पाटी, ना खडू हाती पोछा नि झाडू

पिंपरी - फरशी पुसणे, पाणी भरणे, झाडू मारणे, भिंती-छपराला रंग देण्याचे काम विद्यार्थी (प्राथमिक) करतात का, याचे उत्तर निश्‍चितच नाही, असेच आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या हिंजवडीतील शाळेत ही सर्व कामे विद्यार्थ्यांकडून करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. याबाबत शिक्षिकांकडे विचारणा केली असता, जिल्हा परिषदेकडून सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने, ही सर्व कामे विद्यार्थ्यांकडूनच करून घ्यावी लागत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

‘सकाळ’ प्रतिनिधीने शाळेला भेट दिली असता वास्तव दिसून आले. माहिती-तंत्रज्ञानासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीमधील हे विरोधाभासिक चित्र. सरकारची शिक्षणविषयक अनास्था दर्शविणारे. देश महासत्ता होण्याच्या वाटचालीचे पाईक ठरू पाहणाऱ्या या चिमुरड्यांच्या हातात झाडू देणाऱ्या जिल्हा परिषदेबाबत जेवढा संताप व्यक्त करू, तो कमीच. मात्र, त्याचे कोणतेही सोयरसुतक शिक्षिकांच्या चेहऱ्यावर दिसले नाही. 

मधली सुटी संपून अभ्यासाचे तास सुरू होते. मात्र, काही वर्गात शिक्षिकांचा पत्ता नव्हता. तिसरीच्या वर्गात विद्यार्थी चित्र रंगवीत होते. दोन-तीन विद्यार्थी वर्गाला रंगकाम करत होते. या वर्गात सातवीतील दोन विद्यार्थी टेबलांचे दोन थर लावून छताला रंग देत होते, तर तिसरीतील काही विद्यार्थिनी वर्गाच्या भिंतींना रंग देत होत्या. अभ्यासाचे वातावरण सोडून वर्गात सर्वकाही म्हणजे अस्वच्छता, कोंदटपणा, रंगाचा दर्प होता. ‘तुम्ही का रंग देताय’ असे  मोठ्या विद्यार्थ्यांना विचारले असता, ‘बारक्‍या मुलांचा हात वर पोचत नाय. म्हणून बाईंनी आम्हाला रंग द्यायला लावलाय,’ असे निरागस उत्तर सातवीतील विद्यार्थ्यांनी दिले. 

वर्गाबाहेरील म्हणजेच शाळेच्या परिसरातील चित्र अधिकच आश्‍चर्यकारक होते. पहिली- दुसरीतील चिमुकल्या विद्यार्थिनी शाळेचा व्हरांडा झाडून, पुसून काढत होत्या. काही जणी शाळेच्या मैदानावर दोन-तीनशे मीटर अंतरावर असलेल्या नळावरून पाण्याने भरलेले हंडे व्हरांड्याकडे आणत होत्या. रिकामा हंडा उचलण्याचे वय आणि ताकदही नसलेल्या या विद्यार्थिनी दोन-तीनच्या गटाने पाणी वाहून नेण्याचा कसोशीने प्रयत्न करत होत्या. त्याबाबत त्यांनीही आमच्यासाठी ही कामे नित्याचीच असून, त्याची आम्हाला सवयच झाली असल्याचे सांगितले.

शिक्षिकांचे मौन
विद्यार्थ्यांशी बोलत असतानाचा शाळेबाहेर गेलेल्या शिक्षिका मात्र रमतगमत दाखल झाल्या. ‘सकाळ’ प्रतिनिधीच्या अनपेक्षित प्रश्‍नांनी त्या गडबडल्या. प्रशासनाकडे बोट दाखवून त्यांनी काढता पाय घेतला. त्यांनी पाळलेल्या मौनामुळे संशय अधिक बळकट झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com