शहराला दोन वर्षांत २४ तास पाणी

शहराला दोन वर्षांत २४ तास पाणी

पिंपरी - शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या साह्याने २४४ कोटी रुपयांचा प्रकल्प येत्या महिन्यात हाती घेण्यात येत आहे. दोन वर्षांत तो पूर्ण केला जाणार आहे. यामुळे संपूर्ण शहर पाणीपुरवठ्याच्या २४ बाय ७ योजनेत येणार आहे.

केंद्र सरकारने अमृत योजनेअंतर्गत २४४ कोटी रुपयांच्या महापालिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) मंजुरी दिली आहे. महापालिकेने जेएनएनयूआरएमअंतर्गत शहरातील ४० टक्के भागात २४ बाय ७ ही योजना राबविली आहे. राहिलेल्या भागातही याच पद्धतीने योजना राबविण्यात येत आहे. 

पहिल्यांदा संपूर्ण कामासाठी एक निविदा काढली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आलेल्या निविदांची रक्कम खूप जास्त होती. त्यामुळे शहराचे चार भाग करून त्या भागांसाठी स्वतंत्र निविदा काढण्याचे प्रशासनाने ठरविले. त्यापैकी दोन निविदा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले. त्यांनी ते प्रस्ताव मान्य केले आहेत, असे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत यांनी सोमवारी सांगितले.

मॉडरेट डेन्सिटी पॉलिथिलीन पाइप (एमडीपीई) पद्धतीच्या वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्या गंजत नाहीत. जुन्या वाहिन्या बदलण्यात येतील. नागरिकांचे सर्व नळजोड बदलण्यात येतील. त्यामुळे गळती थांबेल, तसेच अनधिकृत नळजोडही लक्षात येतील. सध्या ३५ टक्के पाणी वाटपाची रक्‍कम महापालिकेला मिळत नाही. ते प्रमाण दहा ते पंधरा टक्‍क्‍यांपर्यंत कमी केले जाईल.
- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग 

नव्या योजनेची उद्दिष्टे
    नऊ ठिकाणी पाणी साठवण टाकी बांधणे
    शहरात नवीन जलवाहिन्या टाकणे
    पाण्याची गळती थांबविणे
    पुरेशा दाबाने पाणी देणे 
    शहरातील साठ टक्के भागात योजना राबविणार

‘स्थायी’मध्ये निविदांचा प्रस्ताव
पाणीपुरवठा योजनेसाठी शहराचे चार भागात विभाजन केले आहे. तीन भागांतील कामांच्या निविदा अंतिम झाल्या आहेत. बुधवारी (ता. २२) त्या स्थायी समिती बैठकीत मंजुरीसाठी सादर केल्या जातील. चौथ्या भागातील निविदेसाठी पुरेसा प्रतिसाद मिळालेला नसल्याने २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

अनियमित आणि बेभरवशाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांपुढे पाणी साठविण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे गृहिणींना मोठी धावपळ करावी लागते. भौगोलिक रचना, कमी दाब आणि इतर तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा पुरेसा होत नाही. महापालिकेच्या नव्या योजनेमुळे शहरात सर्वांना पुरेसे पाणी मिळण्याची शक्‍यता आहे.

पाणी साठवण टाकी....
निगडी जलशुद्धीकरण केंद्र, ईडब्ल्यूएस (निगडी), काळा खडक, पुनवळे, पिंपळे सौदागर, अण्णासाहेब मगर स्टेडियम (खराळवाडी) येथे प्रत्येकी एक, जाधववाडीत दोन टाक्‍या बांधण्यात येणार आहेत. नऊ ठिकाणी नवीन टाक्‍या उभारल्यानंतर तेथून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या भागातील पाण्याचा दाब वाढेल आणि नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल.

विभागनिहाय निविदा...
पहिला भाग : वाकड थेरगाव, पुनावळे, पिंपळे निलख, रहाटणी परिसर : निविदा रक्कम ६१ कोटी २१ लाख रुपये
दुसरा भाग : आकुर्डी, चिखली, जाधववाडी, रुपीनगर परिसर : निविदा रक्कम ५४ कोटी ३३ लाख रुपये
तिसरा भाग : पिंपरी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोडी, रावेत, मामुर्डी परिसर : निविदा रक्कम ५१ कोटी एक लाख रुपये

पाणीपुरवठ्याची सद्यःस्थिती
    शहरात दररोज ५०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा
    अनेक भागांत कमी दाबाने व कमी वेळ पाणी मिळते
    काही भागात एखाद्या दिवशी पाणीच मिळत नाही
    नगरसेवकांकडे नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या
    काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी
    पाणीपुरवठा सुधारण्याबाबत नगरसेवकांचा प्रशासनावर दबाव वाढला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com