पाच वर्षांत ३५ हजार परवडणारी घरे

पाच वर्षांत ३५ हजार परवडणारी घरे

पिंपरी - सामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा, प्राधिकरण व महापालिका या तिन्ही संस्थांनी योजना तयार केल्या असून, पुढील पाच वर्षांत सुमारे ३० ते ३५ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. मात्र महापालिकेने केलेल्या ‘डिमांड सर्व्हे’मध्ये शहराला ६० हजार परवडणाऱ्या घरांची आवश्‍यकता आहे. त्या संदर्भातील नियोजन पालिकेने सुरू केले आहे.

स्वस्त घरांची गरज
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २२ लाखापर्यंत जाऊन पोचली आहे. त्यामुळे स्वस्त घरांची गरज वाढत आहे. येत्या पाच वर्षांत सामान्यांना ३५ हजारांपर्यंत घरे उपलब्ध होणार असली तरी लोकसंख्येचा विचार करता हा आकडा कमी पडणार आहे. 

प्राधिकरणाचा प्रकल्प
सामान्यांसाठी प्राधिकरणाकडून दहा हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या वाल्हेकरवाडीमध्ये ७९२ सदनिका बांधणी प्रकल्प सुरू आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्याचे काम सुरू आहे. तसेच प्राधिकरणातील पेठ क्रमांक १२ मध्ये आठ हजार घरांच्या बांधणीचे नियोजन आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्‍ती केली आहे. भोसरीतील पेठ क्रमांक बारा आणि अन्य काही ठिकाणी निवासी भूखंड विकसित करून परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. 

म्हाडाचे नियोजन
पिंपरी-चिंचवडमध्ये म्हाडाने पुढील पाच वर्षांत सात हजार ४४० घरांचे नियोजन केले आहे. पिंपरीतल्या सर्व्हे क्रमांक ३०९ मध्ये १०३४ व ताथवडे, मोरवाडी परिसरात दोन हजार १०१ घरे बांधण्यात येणार आहेत. परवडणाऱ्या घरांमध्ये तीन हजार ६१९ उपलब्ध होणार असून, त्यातील १२५ घरे आतापर्यंत म्हाडाकडे आली आहेत. दोन वर्षांत उर्वरित घरे म्हाडाकडे येतील.  
लॉटरीद्वारे वाटप 
शहरात बांधण्यात येणाऱ्या परवडणाऱ्या घरांचे वाटप म्हाडा लॉटरीद्वारे करणार आहे. मे महिन्यापर्यंत लॉटरीचे आयोजन करण्यात येईल. काही दिवसांपूर्वी म्हाडाने पाच जिल्ह्यांमध्ये दोन हजार ५०३ घरांसाठी लॉटरी घेतली. त्याचा ताबा मार्च २०१८ पर्यंत देण्याचे नियोजन आहे. 

दरम्यान, गेल्या लॉटरीमध्ये घर मिळालेल्या काही जणांची आर्थिक तरतूद न झाल्यामुळे त्यांनी ही घरे म्हाडाला परत केली. त्याचे प्रमाण सुमारे १० टक्के आहे. म्हाडाकडे परत आलेली घरे प्रतीक्षा यादीमधील लोकांना देण्यात येणार आहेत. 

महापालिकेचेही दहा हजार घरे
महापालिकेने पुढील पाच वर्षांमध्ये परवडणारी दहा हजार घरे उपलब्ध करून देण्याचे निश्‍चित केले आहे. चिखली, चऱ्होली, दिघी, वडमुखवाडी, बोऱ्हाडेवाडी, डुडुळगाव, नेहरूनगर, आकुर्डी, रावेत येथे ही घरे बांधण्यात येणार आहेत. पुढील दोन वर्षांत तीन हजार ६६४ घरे बांधण्याचे नियोजन आहे. बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी, रावेत येथे ही घरे बांधण्यात येणार आहे. आकुर्डीमध्ये ५६८ घरे बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात म्हाडाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. नजीकच्या काळात दिघी आणि चिखली भागातही स्वस्त घरांचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
- अशोक काकडे-देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा

पुढील पाच वर्षांमध्ये दहा हजार घरे बांधण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्याला सुरवात झाली असून, ते काम वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहराला सध्या ६० हजार परवडणाऱ्या घरांची आवश्‍यकता आहे. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्‍त, महापालिका

महापालिका 
    महापालिकेकडून बांधण्यात येणारी घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. 
    घरांचा एरिया ३० चौरस मीटर कार्पेट. 
प्राधिकरण
    प्राधिकरणाकडून बांधण्यात येणारी आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. 
    आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या घरांचा एरिया ३० चौरस मीटर कार्पेट.
    अल्प उत्पन्न गटासाठीचा एरिया ६० चौरस मीटर कार्पेट. 
म्हाडा
    म्हाडाकडून बांधण्यात येणारी परवडणारी घरे अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटांसाठी आहेत. 
    अत्यल्प गटासाठीच्या घरांचा एरिया ३० चौरस मीटर कार्पेट म्हणजे वन बीएचके आहे. 
    अल्प उत्पन्न गटासाठी घरांचा एरिया ३० ते ६० चौरस मीटर कार्पेट असून, त्यामध्ये एक ते दोन बीएचकेचा असेल. 
    मध्यम उत्पन्न गटासाठी घरांचा एरिया ६० ते ८० चौरस मीटर कार्पेट असून, दोन ते तीन बीएचके असेल.
    घरांच्या किमती लॉटरी प्रक्रियेच्या वेळेत ठरल्या जातात.

प्राधिकरणाचे सामान्यांना घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. ती लॉटरीद्वारे देण्यात येणार आहेत. सदनिकांच्या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. 
- सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com