तीन हजार सातशे वाहने मालकांना परत

संदीप घिसे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पिंपरी - वाहन चोरीला गेले की त्याचा शोध लागणे मुश्‍कील असते. वारंवार पोलिस ठाण्यात खेपा मारूनही ते परत मिळत नाही. मात्र ‘गंगामाता वाहन शोध संस्थे’ने  दीड वर्षात तब्बल तीन हजार ७०० वाहनांचा शोध लावला आणि ती मालकांकडे सुपूर्त केली आहेत.

पिंपरी - वाहन चोरीला गेले की त्याचा शोध लागणे मुश्‍कील असते. वारंवार पोलिस ठाण्यात खेपा मारूनही ते परत मिळत नाही. मात्र ‘गंगामाता वाहन शोध संस्थे’ने  दीड वर्षात तब्बल तीन हजार ७०० वाहनांचा शोध लावला आणि ती मालकांकडे सुपूर्त केली आहेत.

वाहनचोरी करायची, गुन्ह्यांमध्ये त्या वाहनांचा वापर करायचा, पेट्रोल संपेपर्यंत चालवायचे आणि नंतर रस्त्यावरच सोडून द्यायचे, असा उद्योग काही चोरटे करतात. या मुळे अनेक महिने वाहन कुठेतरी पडून असते. कधी नागरिकांच्या लक्षात आल्यास पोलिसांना कळवितात. मग पोलिस ठाण्याच्या आवारात बेवारस वाहनांच्या संख्येत भर पडते. यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या आवारात १५० ते २०० वाहने धूळ खात पडलेली असतात. यापैकी काही वाहनांचे स्पेअरपार्ट चोरीस जातात. काही वाहनांना चोरटे बनावट नंबर प्लेट लावतात. मग अशा वाहनांच्या मालकांचा शोध घेणे म्हणजे एक दिव्यच असते. गेल्या अनेक वर्षांपासून पडून असलेल्या या वाहनांच्या मालकाचा शोध पोलिस घेत नाहीत.

दोन वर्षांपूर्वी राम उदावंत यांनी ‘गंगामाता वाहन शोध संस्था’ स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून उदावंत हे पोलिस ठाण्यात जातात. येथील अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर धूळ खात पडलेल्या वाहनांचा चेसी आणि इंजिन क्रमांक घेतला जातो. घेतलेल्या क्रमांकाची यादी तयार केली जाते. ही यादी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाऊन तपासली जाते. चेसी आणि इंजिन क्रमांकावरून वाहन मालकाचा पत्ता शोधला जातो. हा पत्ता पोलिसांना दिला जातो आणि गंगामाता संस्थेतर्फे मालकाला पत्र पाठविले जाते. पुणे आणि परिसरात वाहन मालक राहत असल्यास त्यांच्या घरी जाऊन तुमचे वाहन चोरीस गेले आहे का, असे विचारले जाते. मग आपले वाहन अमुक पोलिस ठाण्यात जमा असल्याचे सांगितले जाते, असे सांगितल्यानंतर आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो, असे उदावंत सांगतात.

उदावंत यांनी तीन हजार सातशे वाहनांचा शोध लावला. एका वाहनाची किंमत जरी कमीत कमी दहा हजार पकडली तरी उदावंत यांनी दीड वर्षांत पावणेचार कोटींच्या वाहनांचा शोध लावला आहे. तसेच ज्या पोलिस ठाण्यात वाहन चोरीस गेल्याचा गुन्हा नोंद आहे ते परत मिळाल्यावर तो गुन्हा निकाली निघतो. यामुळे पोलिस रेकॉर्डवरील गुन्ह्यांची संख्या आपोआपच कमी होते. वाहनाचा शोध लावून दिल्यावर नागरिक खूष होऊन जी बक्षिसी देतात. त्यावरच उदावंत यांच्या संस्थेचे काम चालते.

अनमोल कामगिरी
‘गंगामाता वाहन शोध’ पथकाने राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूर, बीडसह अनेक जिल्ह्यांतून चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध लावला आहे. एवढेच नव्हे तर कर्नाटकमधून चोरीस गेलेले वाहन रांजणगाव पोलिस ठाण्यात बेवारस पडल्याचे शोधून काढले. यामुळे अनेक पोलिस ठाण्याकडून त्यांना बोलावले जाते.

Web Title: pimpri pune news 3700 vehicle return to owner