पिंपरी मंडईतील निम्मे गाळे बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

शेतकरी संपाचा परिणाम; भाज्यांच्या भावात १० टक्‍क्‍यांनी वाढ
पिंपरी - शेतकरी संपामुळे पिंपरी कॅम्पातील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईतील भाजीपाल्याची आवक गुरुवारी पहिल्याच दिवशी कमालीची रोडावली. त्यामुळे मंडईतील निम्मे गाळे जवळपास बंद राहिले. काही भाज्यांच्या भावात ५ ते १० टक्‍क्‍यांची वाढ झाली. शुक्रवारी (ता. २) भाजीपाल्याची आवक आणखी कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

शेतकरी संपाचा परिणाम; भाज्यांच्या भावात १० टक्‍क्‍यांनी वाढ
पिंपरी - शेतकरी संपामुळे पिंपरी कॅम्पातील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईतील भाजीपाल्याची आवक गुरुवारी पहिल्याच दिवशी कमालीची रोडावली. त्यामुळे मंडईतील निम्मे गाळे जवळपास बंद राहिले. काही भाज्यांच्या भावात ५ ते १० टक्‍क्‍यांची वाढ झाली. शुक्रवारी (ता. २) भाजीपाल्याची आवक आणखी कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर शेतकरी संघटनांनी गुरुवारपासून संपाला सुरवात केली आहे. त्याचा परिणाम शहरातील प्रमुख पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडईवरही तीव्रतेने झाला. पूर्वनियोजित संपामुळे शेतकऱ्यांनी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे अधिकाधिक शेतमालाची आदल्या दिवशी विक्री केली. प्रामुख्याने मार्केट यार्ड येथूनच मंडईत बहुतेक शेतमालाची आवक  होते; मात्र संपाच्या पहिल्याच दिवशी मार्केट यार्ड येथे शेतमालाची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम पिंपरी मंडईवर झाला. 

जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे पिंपरी-चिंचवड उपबाजार विभागप्रमुख आर. एस. शिंदे म्हणाले, ‘‘पिंपरी मंडईत मुख्यत्वे गुलटेकडी मार्केट यार्ड येथून भाजीपाल्याची आवक होते; परंतु त्याचबरोबर खेड, शिरूर, मावळ, मुळशी आणि पूर्व हवेलीमधील 

काही शेतकरीही पिंपरी मंडईत शेतमालाची विक्री करतात. शेतकरी संपामुळे पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या आवकेत घट झाली. फळभाज्यांच्या ४२ टक्के, तर पालेभाज्यांच्या आवकेत २६ टक्‍क्‍यांची घट झाली. संपाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी फळभाज्यांची १० हजार ४२४ किलो, तर पालेभाज्यांची १६ हजार ३२४ जुड्यांची आवक झाली होती; परंतु गुरुवारी केवळ सहा हजार १८१ किलो फळभाज्या आणि १३ हजार ७०५ जुड्या पालेभाज्यांची आवक झाली.’’

भेंडी, गवार, काकडी, कारली महाग
फळभाज्यांमध्ये भेंडी, गवार, भुईमूग शेंग, काकडी, कारली, बीट, फ्लॉवर, कोबी, वांगी, शेवगा, तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक, अंबाडी, चुका यांच्या भावात ५ ते १० टक्‍क्‍यांची वाढ झाली.

खैरे, खंडागळे यांची देखरेख
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे आणि सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी संप काळात शेतमालाचे नियमन व्यवस्थित राहावे, यासाठी आवर्जून लक्ष देत आहेत. शेतमालाच्या आवकेवर आणि परिस्थितीवर त्यांची देखरेख चालू आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना पहाटेपासून जबाबदारीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.