शहरात धावणार पाच हजार सीएनजी स्कूटर

शहरात धावणार पाच हजार सीएनजी स्कूटर

पिंपरी - आतापर्यंत चारचाकी वाहनांना उपलब्ध असणारी सीएनजीची सुविधा आता दुचाकी स्कूटरला उपलब्ध होणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील पाच हजार स्कूटर्सना सीएनजी कीट बसविण्याचा उपक्रम महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने हाती घेतला आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. २४) केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते होणार आहे. 

स्कूटरला बसविण्यात येणाऱ्या सीएनजी किटची किंमत १७ हजार रुपये आहे. मात्र, एमएनजीएलने केलेल्या विशेष प्रयत्नामुळे हे कीट बारा हजार रुपयांत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज उपलब्ध होणार आहे. कर्ज घेऊन हे कीट बसविणाऱ्या पहिल्या पाच हजार वाहनांचे व्याज हे एमएनजीएल भरणार आहे. दुचाकीला सीएनजी कीट बसविल्याने मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर यांनी सांगितले. 

दुचाकीला सीएनजी कीट लावल्याने शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून, इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. पेट्रोल आणि सीएनजी या दोन्हींमुळे होणाऱ्या प्रदूषणात पन्नास टक्‍क्‍यांचा फरक आहे. सीएनजीमुळे होणारे प्रदूषण कमी आहे. 

स्कूटरला सीएनजी कीट बसविण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर मोटारसायकलचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वास तांबेकर यांनी व्यक्‍त केला. स्कूटरप्रमाणेच मोटारसायकललाही सीएनजी कीट बसवता येऊ शकते, यासंदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. 

शहरात सीएनजीच्या पंपांची संख्या वाढत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही ठिकाणी मिळून ५० पंप कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये २३ तर पुण्यात २७ पंप कार्यरत आहेत. या सर्व पंपांवर पुरेशा प्रमाणात सीएनजी गॅस उपलब्ध असल्याने सीएनजी कीट बसविणाऱ्या दुचाकीस्वारांची कोणतीही गैरसोय होणार नाही. येत्या काही दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही ठिकाणी २० नवे सीएनजी पंप सुरू करण्यात येणार असल्याचे तांबेकर यांनी सांगितले.

पैशांची बचत
सीएनजी कीट बसविल्यानंतर दुचाकीस्वारांना फायदा होणार आहे. तुम्ही जर दररोज ५० किलोमीटर दुचाकी चालवीत असाल तर त्यासाठी १.२५ लिटर पेट्रोल खर्ची पडते, त्यासाठी येणारा खर्च ९५ रुपये आहे. मात्र, सीएनजीचे दुचाकी वाहन वापरताना त्यात प्रतिदिवसाला थेट ६० रुपयांची बचत होणार आहे. दररोज शंभर किलोमीटर स्कूटर चालविली जात असेल तर त्यासाठी अडीच लिटर पेट्रोल लागते आणि १८९ रुपये खर्च होतात. हेच वाहन सीएनजीवर असल्यास त्यासाठी दीड किलो सीएनजी लागतो आणि त्यासाठी ७० रुपये मोजावे लागतात. सीएनजीच्या वापरामुळे वाहनचालकांची थेट 
११९ रुपयांची बचत होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com