खंडोबा माळ चौक ते संभाजी चौक अपघाताचा धोका; वाहने सावकाश हाका

रवींद्र जगधने
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पिंपरी - मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, बेकायदा पार्किंग आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे आकुर्डीतील खंडोबा माळ चौक-म्हाळसाकांत चौक- संभाजी चौकापर्यंतच्या रस्त्यावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

पिंपरी - मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, बेकायदा पार्किंग आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे आकुर्डीतील खंडोबा माळ चौक-म्हाळसाकांत चौक- संभाजी चौकापर्यंतच्या रस्त्यावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

याकडे महापालिका व पोलिस प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग, रावेत, द्रुतगती महामार्ग, निगडी- प्राधिकरण आदी परिसराला जोडणारा म्हाळसाकांत चौक हा महत्त्वाचा चौक आहे. तसेच या परिसरात शाळा व महाविद्यालय असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. सिग्नल बंद, व्यवस्थित न झालेली रस्त्याची कामे, त्यात रस्त्यावर दुकानदार, फळे, भाजीपाला, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या व टपऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. ग्राहक रस्त्यावर वाहने लावून खरेदी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होता. तसेच अनेकदा छोटे-मोठे अपघातही होतात.

गुरुवारी अशा पद्धतीने झालेल्या अपघातात आशिष पावसकर (वय १९) या महाविद्यालयीन तरुणाचा बळी गेला. या घटनेनंतरही प्रशासन काही धडा घेणार आहे का, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

पदपथ गायब 
म्हाळसाकांत परिसरात दोन्ही बाजूंचे पदपथ अतिक्रमणामुळे गायब झाले असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. पदपथावर व्यवसाय करणारे गेली दहा ते पंधरा वर्षांपासून धंदा करत आहेत. तर काही टपरीधारकांना महापालिकेने परवानेही दिले आहेत. त्यांचे इतरत्र पुनर्वसन होणे गरजेचे आहे. 

बेशिस्त चालक, रोडरोमिओंचा उपद्रव
शाळा व महाविद्यालय असल्याने म्हाळसाकांत परिसरात रोडरोमिओंचा कायमच हैदोस असतो. अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने, अतिवेगात वाहने चालवतात. त्यामुळे येथे अनेकदा छोटे-मोठे अपघात होतात.

हे करायला हवे
रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे काढावीत
पदपथ रस्त्यापेक्षा उंच बांधावे
पार्किंग झोन व नो पार्किंग झोन तयार करावा
विद्यार्थ्यांसह पालकांनाही वाहतूक नियमांचे धडे द्यावेत 
जड वाहनांना या मार्गावर प्रवेश बंद करावा

महापालिकेचा अतिक्रमण विभाग या भागात सतत कारवाई करत असतो. मात्र, कारवाई केल्यानंतर संबंधित पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण करतात. 
- आशादेवी दुरगुडे,  क्षेत्रीय अधिकारी, ‘अ’ प्रभाग

म्हाळसाकांत मार्गावर जड वाहनांना प्रवेश नाही. या परिसरात वाहतूक कोंडीही शक्‍यतो होत नाही. आशिष पावसकर हा चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करत असल्यामुळे धक्का लागून त्याचा अपघात झाला. 
- दुर्योधन पवार, पोलिस निरीक्षक, निगडी विभाग