अचूक निदानामुळे बालकाला जीवदान

संदीप घिसे
मंगळवार, 11 जुलै 2017

पिंपरी - वायसीएम रुग्णालयातील सोनोग्राफी तपासणीत केलेले अचूक निदान आणि त्यानंतर अवघ्या एका तासात केलेली शस्त्रक्रिया यामुळे दापोडीतील एका १३ वर्षीय बालकास नवजीवन मिळाले. यामुळे त्या बालकाच्या माता-पित्यांनी डॉक्‍टरांचे आभार मानले.

पिंपरी - वायसीएम रुग्णालयातील सोनोग्राफी तपासणीत केलेले अचूक निदान आणि त्यानंतर अवघ्या एका तासात केलेली शस्त्रक्रिया यामुळे दापोडीतील एका १३ वर्षीय बालकास नवजीवन मिळाले. यामुळे त्या बालकाच्या माता-पित्यांनी डॉक्‍टरांचे आभार मानले.

आशिष रमेश कांबळे असे नवजीवन मिळालेल्या १३ वर्षीय बालकाचे नाव आहे. तो दापोडी येथे राहत असून त्याचे वडील वेल्डिंगचे काम करतात. आई गृहिणी असून त्यास एक लहान बहीणही आहे. ३ जुलै रोजी आशिषला वायसीएम रुग्णालयातील आणले. त्या वेळी त्याला पोट दुखणे, उलट्या होणे व १०३ ताप होता. आशिषचा रक्‍तदाब आणि नाडीचे ठोके अतिशय कमी झाल्याने डॉक्‍टरांनी सोनोग्राफी व इतर तपासण्या केल्या. त्याच्या पोटात गॅस असल्याने सोनोग्राफीत काहीच निदान झाले नाही. यामुळे दोन दिवसांनी सोनोग्राफी केली. तसेच तपासण्याच्या रिपोर्टमध्ये आशिषला टॉयफाईड ताप आल्याचे निदान झाले.

त्यामुळे बहुतांशवेळा आतडी किंवा जठराला छिद्र पडते. मात्र लाखात एखादी केस अशी असते की पित्ताशयाच्या पिशवीला छिद्र पडते. याबाबत सोनोग्राफीच्या डॉ. अलका बनसोडे यांनी अचूक निदान करीत याबाबतचा अहवाल शस्त्रक्रिया विभागाचे डॉक्‍टर संजय पाडळे यांना दिला. तसेच ज्या ठिकाणी छिद्र पडले आहे त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे सांगितले. यामुळे अवघ्या एका तासात डॉक्‍टरांनी शस्त्रक्रियेची तयारी केली.

आशिषच्या आई-वडिलांना शस्त्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. या शस्त्रक्रियेत ७० टक्‍के वाचण्याची संधी असते, तर ३० टक्‍के रुग्णांच्या बाबतीत गुंतागुंत होऊन प्रकृती खालावण्याची शक्‍यता असते. शस्त्रक्रियेमुळे निर्माण होणारे धोकेही सांगण्यात आले. त्यांची संमती आल्यावर पुढील प्रक्रिया सुरवात केली. भूलतज्ज्ञ डॉ. राजेश गोरे आणि मनोज राऊत यांनी आपले काम चोखपणे पार पाडले. डॉ. संजय पाडळे व त्यांचे सहकारी डॉ. पुष्कर गालम यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. सध्या आशिषवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीस कोणताही धोका नसल्याचे डॉ. पाडळे यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दीड लाखापर्यंत खर्च आला असता. एवढे पैसे एका दिवसात उभे करणे आम्हाला शक्‍य नव्हते. मात्र, वायसीएम रुग्णालयातील डॉक्‍टर आमच्या मदतीला देवासारखे धावून आले. त्यांच्यामुळेच आमच्या आशिषला नवजीवन मिळाले.
- रमेश कांबळे