पराभवानंतर शहरातील पहिला दौरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

पिंपरी - महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार चार महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर गुरुवारी (ता. ६) प्रथमच पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी आक्रमकपणे विरोधकाची भूमिका बजावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पिंपरी - महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार चार महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर गुरुवारी (ता. ६) प्रथमच पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी आक्रमकपणे विरोधकाची भूमिका बजावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी पक्षसंघटना बळकट करण्यासाठी, तसेच सध्याच्या पक्ष कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. पुण्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी (ता. ५) झाला. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक म्हणून फारशी आक्रमक नसल्याबद्दल विचारणा केली असता, पवार म्हणाले, ‘‘तशी वस्तुस्थिती नाही. पक्षाच्या नगरसेवकांना त्यांनी सभागृहातून निलंबितही केले होते. परत ते निलंबन मागे घेतले. भाजपच्या नेत्यांनी कालही आमच्या पक्षाविरुद्ध काही आरोप केले. पिंपरीत मी उद्या जाणार असून, त्यावेळी याबाबत चर्चा करेन.’’

ते म्हणाले, ‘‘आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. पण, शहरी भागात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून लोक मतदान करतात. त्यामुळे भाजपला वाटल्या नव्हत्या एवढ्या जागा मिळाल्या. मोदी यांचा करिष्मा अजूनही काही प्रमाणात आहे. आम्ही केलेली विकासकामे मतदारांसमोर मांडायला कमी पडलो.’’ पिंपरीतील पक्षाच्या परिस्थितीबाबत ते म्हणाले, ‘‘महापालिकेत सत्ता आल्यानंतर पहिले शंभर दिवस त्यांना स्थिर होऊ द्यावे, या उद्देशाने मी बोललो नाही. पिंपरी-चिंचवड भागात मी अन्य कामांसाठी तीनदा गेलो. मात्र, सार्वजनिकरीत्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला नाही. मी उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला जाणार आहे. तेथे मी त्यांच्याशी बोलेन. तेथील राजकीय परिस्थितीची माहिती घेईन.’’ पुण्यामध्ये पवार यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांची भूमिका आक्रमकपणे बजावण्याचा आदेश दिला आहे. त्याच पद्धतीची भूमिका ते पिंपरी-चिंचवडच्या मेळाव्यातही घेण्याची चिन्हे आहेत.