सत्तेसाठी ते हपापलेले - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पिंपरी - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी त्यांना पदे दिली. त्यांना मोठे केले. आता ते तिकडे गेले. त्यांचे ध्येय विकास नाहीच. माझ्याएवढे पटकन निर्णय आता होत नाहीत. ते निव्वळ सत्तेला हपापलेले लोक आहेत. दिवस बदलतील. त्या वेळी हे लोक कोठे असतील, ते पहा. तेव्हा विचारा,’’ असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना धारेवर धरले. शहराचा विकास थांबला आहे का, असा प्रश्‍न विचारला असता, पवार यांनी शहरातील आमदारांची नावे न घेता या शब्दांत टीकास्त्र सोडले. 

पिंपरी - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी त्यांना पदे दिली. त्यांना मोठे केले. आता ते तिकडे गेले. त्यांचे ध्येय विकास नाहीच. माझ्याएवढे पटकन निर्णय आता होत नाहीत. ते निव्वळ सत्तेला हपापलेले लोक आहेत. दिवस बदलतील. त्या वेळी हे लोक कोठे असतील, ते पहा. तेव्हा विचारा,’’ असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना धारेवर धरले. शहराचा विकास थांबला आहे का, असा प्रश्‍न विचारला असता, पवार यांनी शहरातील आमदारांची नावे न घेता या शब्दांत टीकास्त्र सोडले. 

महापालिकेतील पंधरा वर्षांची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून गेल्यानंतर, विकासकामांचा आढावा घेण्याच्या निमित्ताने पवार सहा महिन्यांनी शुक्रवारी महापालिका भवनात आले. त्यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या भागातील प्रलंबित कामांबाबत आयुक्तांना सांगण्यास सांगितले.

त्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष शहरात काम करीत नसल्याच्या प्रश्‍नावर पवार म्हणाले, ‘‘सत्तेवर बसून काम करायची सवय लागली आहे. आपण जे शहर वाढविले त्याचा बकालपणा वाढतो आहे. कचरा समस्या वाढली आहे. बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. प्रशासनाला गती देण्याचा प्रयत्न कोण करतो आहे? मंत्रालयात कामे मार्गी लावण्यासाठी कोण प्रयत्न करतो? मुख्यमंत्री बटने दाबून विकासकामांची उद्‌घाटने करतात. पालकमंत्री किती येतात, ते सांगा. कोठेतरी सल मनात होती. नगरसेवकांचेही तसेच आहे. नगरसेवकांनी आयुक्तांची वेळ घेतली. त्या बैठकीला मीच येतो म्हणालो. सहा महिन्यांत अनुभव आला. भाजपच्या बैठकीत आरोप प्रत्यारोप झाले. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका जबाबदारीने पार पाडेल. पारदर्शक काम होते की नाही, या बाबत अंकुश ठेवण्याचे काम करू.’’ 

नोटाबंदी फेल झाली. विकासदर घटला. साडेतीन वर्षे झाल्यावरही अच्छे दिन आले नाहीत. राजू शेट्टी टीका करू लागले. महादेव जानकर मंत्री झाल्यावर धनगर आरक्षणाचा मुद्दा विसरले. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले टीका करू लागले. आमदारही दबक्‍या आवाजात बोलू लागले. सोशल मीडियावरूनही टीका होऊ लागली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला वेळकाढूपणा चालला आहे. शिवसेनेचीही भूमिका सत्ताधाऱ्याची आहे की विरोधकाची हे कळत नाही, असेही पवार यांनी सांगितले.  

पिंपरीत सात ऑक्‍टोबरला मोर्चा 
शंभर दिवसांत महागाई कमी करू, असे सत्तेवर येताना भाजपचे नेते म्हणाले होते. आता हजार दिवस झाले. वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक ते सात ऑक्‍टोबरदरम्यान राज्यभर निषेध मोर्चे काढण्यात येतील. पिंपरी-चिंचवडमध्ये सात ऑक्‍टोबरला महागाई विरोधी मोर्चा काढणार असून, त्याला मी उपस्थित राहणार आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बुलेट ट्रेनपेक्षा करा रेल्वेचे सक्षमीकरण - अजित पवार
‘‘अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाऱ्या केंद्र सरकारने बुलेट ट्रेनऐवजी रेल्वे प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यावर भर द्यावा. रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण करावे. बुलेट ट्रेनचा फायदा फक्त गुजरातला होणार आहे. महाराष्ट्राच्या हाती काहीच येणार नाही,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली. मुंबई येथील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर शुक्रवारी (ता. २९) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्या पार्श्‍वभूमीवर ते म्हणाले, ‘‘रेल्वेची परिस्थिती भीषण असल्याने अशा दुर्घटना घडतात. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे रेल्वेमधील सुधारणांसाठी आग्रही होते. त्यांचे बुलेट ट्रेनला प्राधान्य नसल्याने त्यांच्याऐवजी पीयूष गोयल यांना रेल्वेमंत्रिपद दिले गेले, अशा बातम्या होत्या.’’