टक्केवारीवर हल्लाबोल?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

पिंपरी - महापालिका निवडणुकीनंतर तीन महिन्यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने गुरुवारी (ता. ६) शहरात येणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या टक्केवारीच्या मुद्यावर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असून, अजित पवार त्याचाच खरपूस समाचार घेणार असल्याचे समजते.

पिंपरी - महापालिका निवडणुकीनंतर तीन महिन्यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने गुरुवारी (ता. ६) शहरात येणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या टक्केवारीच्या मुद्यावर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असून, अजित पवार त्याचाच खरपूस समाचार घेणार असल्याचे समजते.

तीन महिन्यांपूर्वी (मार्च) महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. त्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि भाजपला घवघवीत यश मिळाले. निकालाबद्दल आत्मचिंतन करण्यासाठी कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्याचे आयोजन होते. पवार यांची वेळ मिळत नसल्याने ती पुढे ढकलण्यात आली. उद्या प्रथमच कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा होत आहे. त्यामुळे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अजित पवारांच्या भाषणाकडे लक्ष लागून राहिले आहे.

सत्तेत आल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत अवमानकारक वागणूक दिली. विरोधी पक्षनेता म्हणून ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी थोड्या मोठ्या आकारातील स्वतंत्र कक्षाची मागणी केली होती. तीन महिने अक्षरशः त्यांना टोलावण्यात आले. शास्तीकर संपूर्ण माफ करण्याच्या मुद्यावर गोंधळ घातला म्हणून महापालिकेच्या इतिहासात प्रथमच चार सदस्यांना थेट निलंबित करण्यात आले. त्या वेळी महापौर नितीन काळजे आणि भाजपच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन केले. तब्बल पंधरा दिवसांनी महापौर काळजे यांनी आपला निर्णय मागे घेतला. योगेश बहल, मंगला कदम, दत्ता साने आणि मयूर कलाटे या राष्ट्रवादीच्या बलाढ्य नगरसेवकांनाच निलंबित केल्याने भाजपवर टीका झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्ता मिळविलेल्या भाजपवरही आता टक्केवारीचे आरोप सुरू आहेत. मार्चअखेरीचे कारण सांगत सुमारे २०० कोटी रुपयांच्या फाइल्स अडवून ठेवल्या होत्या. त्यात टक्केवारी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेऊन केला. प्रमोद साठे नावाच्या व्यक्तीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टलवर त्याबाबत तक्रार केल्याचा हवाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला. या प्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात हा तक्रारदार एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून, मोकातील आरोपी असल्याचा पलटवार नंतर भाजपने पत्रकार परिषदेत केला. या सर्व प्रकरणाची पवार यांनी गंभीर दखल घेतली असून, ते आपल्या शैलीत याचा समाचार घेणार असल्याचे समजते.

अन्यायाविरोधातील भूमिकेकडे लक्ष
महापालिका अर्थसंकल्पातही राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांना डावलण्यात आले. उपसूचना न स्वीकारता पाच मिनिटांत अर्थसंकल्प मंजूर केल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने ठाकले होते. भाजपने राष्ट्रवादीवर कडी केल्याने विरोधी सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अशा प्रकारे सत्ताधारी भाजप प्रत्येकवेळी राष्ट्रवादीवर अन्याय करत असल्याने आता स्वतः अजित पवार त्याबाबत काय भूमिका घेतात, याची कार्यकर्त्यांना उत्कंठा आहे.
 

साठे हा संघाचाच - वाघेरे

प्रमोद साठे हा संघाचाच स्वयंसेवक आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकाद्वारे केला आहे. भ्रष्टाचाराबाबतच्या त्याच्या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालय घेईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

प्रमोद साठे हा मोकातील आरोपी असून, राष्ट्रवादीने भाजपला बदनाम करण्यासाठी त्याला पुढे केल्याचा आरोप आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी (ता. ४) पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपाला वाघेरे बुधवारी पत्रक काढून उत्तर दिले. 

गेल्या वर्षीची थकीत बिले देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी टक्‍केवारी मागत असल्याची तक्रार साठे नावाच्या व्यक्‍तीने थेट पंतप्रधान कार्यालयाकडे महिनाभरापूर्वीच केली आहे. ती व्यक्‍ती जर गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची असेल, तर भाजपने दुसऱ्या दिवशीच त्याचे स्पष्टीकरण का दिले नाही, असा सवालही वाघेरे यांनी पत्रकात केला आहे.  

पत्रकात म्हटले आहे की, आमचा प्रमोद साठेशी कोणताही संबंध नाही. पण त्याने केलेला आरोप महानगरपालिकेशी संबंधित आहे. त्यामुळे तक्रारदाराला असल्या प्रवृत्तीच्या लोकांकडून धोका संभवतो, म्हणून त्याच्या सुरक्षेची मागणी केली आहे. सीमा सावळे व सारंग कामतेकर स्थायी समितीच्या आडून कोट्यवधींची माया गोळा करीत असताना राष्ट्रवादी त्यांना अडचण ठरत आहे. पैसे खायला विरोध होत असल्याने भाजपवाले बिथरले असल्याने ते राष्ट्रवादीवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असा आरोपही वाघेरे यांनी केला आहे. 

शहराचा विकास कोणी केला आणि आता भ्रष्टाचार कोण करतंय, हे लोकांना वेगळे सांगण्याची गरज नाही. भाजपला मोदींच्या नावामुळे सत्ता मिळाली असून, त्याची मस्ती आली आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप हेदेखील पूर्वी राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादीच्या माजी स्थायी समिती अध्यक्षांवर त्यांनी टीका केली. मात्र त्या व्यक्‍तीला अध्यक्ष कोणी केले? भाजपनेही २०१७ मध्ये मोका लागलेल्या आणि जेलवारी केलेल्यांना शहरात उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांनी स्वतःचा भूतकाळ विसरू नये. राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या पोटापाण्याची काळजी भाजपने करू नये. पैसे खाण्यासाठी हपापलेल्या सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी प्रखर विरोध केला जाईल व पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात कायम सहकार्य राहील, असेही वाघेरे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

पुणे

पुणे - बाजीराव रस्त्यावर पोलिस वाहतूक शाखेने "नो पार्किंग'चे फलक लावले आहेत. मात्र, जेथे फलक लावले तेथेच बेशिस्त चालक वाहने...

06.03 AM

पुणे - "स्मार्ट सिटी', "स्मार्ट मोबिलिटी' आणि "इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आयओटी) या क्षेत्रातील स्टार्टअप्सला तंत्रज्ञानासह सर्व...

05.21 AM

पुणे - शहरातील ‘प्रीमियम’ (मोक्‍याची जागा) व्यावसायिक मालमत्तांची उपलब्धता आणि ती मिळण्याचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे...

05.00 AM