ताबा असणाराच जागेचा मालक - माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

पिंपरी - ‘‘सरकार दरबारी ज्याच्याकडे जागेचा ताबा असतो, तोच जागेचा मालक असतो. सध्या रिंगरोडच्या जागेचा ताबा तुमच्याकडे असल्याने तुम्हीच जागेचे मालक आहात. आपला हा मालकीहक्‍क शाबूत ठेवण्यासाठी होणाऱ्या संघर्षाला तयार राहा,’’ असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केले.

घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने काळेवाडी फाटा येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल कलाटे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, विलास सोनावणे, हिरामण बारणे आदी उपस्थित होते.

पिंपरी - ‘‘सरकार दरबारी ज्याच्याकडे जागेचा ताबा असतो, तोच जागेचा मालक असतो. सध्या रिंगरोडच्या जागेचा ताबा तुमच्याकडे असल्याने तुम्हीच जागेचे मालक आहात. आपला हा मालकीहक्‍क शाबूत ठेवण्यासाठी होणाऱ्या संघर्षाला तयार राहा,’’ असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केले.

घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने काळेवाडी फाटा येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल कलाटे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, विलास सोनावणे, हिरामण बारणे आदी उपस्थित होते.

कोळसे-पाटील म्हणाले, ‘‘येथे घरे होताना प्रशासन झोपले होते का? घरांना सुविधाही तुम्हीच पुरविल्या. मग आता त्यावर बुलडोझर का फिरवत आहात? हक्‍काची घरे वाचविण्यासाठी येथील महिला रस्त्यावर उतरल्या. आता तुम्ही ठरवा, संघर्ष करून लढायचे की सडून मरायचे? जर तुम्ही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला, तर सरकार नमल्याशिवाय राहणार नाही.’’

ते म्हणाले, ‘‘पूर्वीचे सरकार नालायक होते म्हणून यांना निवडून दिले. मात्र, हे सरकार तर महानालायक निघाले. सत्ताधाऱ्यांच्या जिवावर नाचणारे पोलिस गुन्हेगारांना सॅल्यूट करीत आहेत. ते तुम्हाला भूलथापा देणारी आश्‍वासने देतील. त्याला बळी पडून शांत बसू नका.’’

कांबळे म्हणाले, ‘‘पूर्वी पिंपळे सौदागरमधील आरक्षणात नातेवाइकाची जागा जात असल्याने आरक्षण बदलले. येथे तर हजारो जणांची घरे बाधित होत आहेत. पर्याय असतानाही त्याचा विचार केला जात नाही. लोकांच्या घरावरून नांगर फिरवूनच तुम्हाला विकास करायचा आहे का? आमचे सरकार आल्यास तुमच्या घराच्या विटेलाही धक्‍का लागू देणार नाही, असे म्हणणारे आमदार आज रिंगरोड होणारच, अशी भाषा करतात. त्यांच्या खुर्चीला हात घातल्याशिवाय त्यांची सत्तेची धुंदी उडणार नाही.’’ 

भापकर म्हणाले, ‘‘तुमच्या घरांना हात लावू देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनी आझाद मैदानात येऊन सांगितले होते. आता ते कुठे आहेत.’’

तुमच्या आंदोलनात लाठी खाण्याची, जेलमध्ये जाण्याची किंवा गोळ्या खाण्याची वेळ आल्यास सर्वांत पुढे मी असेल.
- बी. जी. कोळसे-पाटील, माजी न्यायमूर्ती

रिंगरोडबाधितांना आवास योजनेत घर - जगताप

बिजलीनगर आणि थेरगाव येथील रिंगरोडबाधित नागरिकांना ‘पंतप्रधान आवास’ योजनेतून घरे देण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन आमदार लक्ष्मण जगताप यांनी घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला मंगळवारी (ता.४) दिले.

बिजलीनगर परिसरातील सुमारे ४५० मिळकती रिंगरोडमुळे बाधित होणार असून, जवळपास ८०० कुटुंबे बेघर होणार आहेत. अशाच प्रकारे थेरगाव परिसरातही दाट लोकवस्ती असून, तेथील घरांवरही कारवाई होणार असल्याने घरे वाचविण्यासाठी येथील नागरिक एकत्र आले असून त्यांनी ‘घर बचाव संघर्ष समिती’ स्थापन केली आहे. मंगळवारी या संघर्ष समितीमधील विजयकुमार पाटील, राजेंद्र देवकर, रेखा भोळे आणि रजनी पाटील यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘रिंगरोडनेबाधित नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्याचा आपण प्रयत्न करू. मात्र घरे वाचविणे आपल्या हातात नाही.’’

...आणि त्यांना रडू कोसळले
घर बचाव संघर्ष समितीमधील कार्यकर्ते आपली घरे वाचावीत म्हणून मोठ्या आशेने आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे गेले होते. मात्र येथील घरांवर कारवाई होणार, असे आमदारांनी सांगितल्यावर महिलांना आमदारांसमोरच रडू कोसळले. कार्यालयातून बाहेर आल्यावरही त्या महिला रडत होत्या.