जैव कचऱ्याचा धोका

जैव कचऱ्याचा धोका

निगडी - आरोग्यासाठी अतिधोकादायक असणारा जैव वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) शहरात विविध ठिकाणी उघड्यावर टाकला जातो. यातून काही वैद्यकीय व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई झाली; मात्र हा प्रश्‍न अजूनही कायम आहे.

1) मोठी हॉस्पिटल्स, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, दातांचे दवाखाने, क्‍लिनिक अशा वैद्यकीय उपचार होणाऱ्या ठिकाणावरून शहरात रोज सोळाशे ते सतराशे किलो जैव वैद्यकीय कचरा निर्माण होतो. 
2) पालिकेकडे ४८४ हॉस्पिटल, दोन हजार क्‍लिनिक, पॅथॉलॉजी लॅब यांची नोंदणी आहे. 
3) बिगरनोंदणी केलेली सहाशे क्‍लिनिक या सर्वांत मिळून पावणेदोन टन कचरा निर्माण होतो. 
4) पिंपरी-चिंचवड पालिकेने या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे कंत्राट ‘पास्को’ या कंपनीस दिले आहे.

२७५ - शहरातील कचरा उचलण्याची ठिकाणे
०१ - कचरा नष्ट करण्याचे ठिकाण

अशी होते प्रक्रिया
1) पिवळ्या रंगाच्या पिशवीत रक्ताशी संपर्क आलेल्या वस्तू बारकोड लावून इनसिनेटरमध्ये टाकल्या जातात. आठशे अंश तापमानाला त्या जाळल्या जातात. जमा होणारी राख रांजणगाव येथे महाराष्ट्र इन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीकडे पाठवली जाते. ही राख तेथे सुरक्षितपणे विशिष्ट खोलीवर गाडली जाते. 
2) लाल रंगाच्या पिशवीत प्लॅस्टिक वस्तू जमा केल्या जातात. १२१ अंश तापमानावर ऑटो क्‍लेव्ह मशिनमध्ये पाऊण तास त्यावर प्रक्रिया केली जाते. काही प्लॅस्टिक येथे वितळते व उर्वरित प्लॅस्टिकचा चुरा केला जातो. तो पुनर्प्रकियेसाठी पाठवला जातो.
3) पांढऱ्या डब्यात धातू (सुया, ब्लेड इत्यादी) गोळा करतात. सोडिअम हायपोक्‍लोराइडमध्ये त्या टाकल्या जातात व लॅंड फिलिंगसाठी पाठवले जाते. याबाबत पुनर्प्रक्रियेची सोय उपलब्ध नाही. 
4) निळ्या रंगाच्या बॉक्‍स किंवा डब्यात काच व त्या प्रकारच्या वस्तू जमा करतात. या सर्व संकलित कचऱ्यास संबंधितांचा बारकोड असतो.

या कचऱ्याबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे 
1) वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनी तो कचरा इतस्ततः न टाकता यासंदर्भातील आचारसंहितेचे पालन करावे
2) या कचऱ्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी
3) असा कचरा आढळल्यास नागरिकांनी त्वरित पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क करून माहिती द्यावी 
4) नागरिकांनी कचरा त्वरित उचलण्यासाठी आग्रही असावे
5) कचरा विल्हेवाट लावणाऱ्या ठेकेदार कंपनीनेही कचरा संकलन करणाऱ्या सर्व गाड्या क्‍लिनिकपर्यंत कशा पोचतील हे पाहावे 
6) कचरा संकलनाची ठिकाणे वाढवावीत

जैव कचऱ्याचे दुष्परिणाम
1) वैद्यकीय उपचारातून निर्माण होणारा कचरा हा मानवी आणि जनावरांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक  
2) विविध संसर्गजन्य रोगांची लागण होऊ शकते
3) टीबी, त्वचा विकार होऊ शकतो 
4) श्‍वसनसंस्थेसंदर्भातील अनेक आजार उद्‌भवू शकतात 
5) लहान मुलांच्या हातात पडल्यास त्यांना अपाय होऊ शकतो

सर्वाधिक निर्मिती होणारे राज्य - कर्नाटक ६२,२४१ किलो प्रतिदिन
विल्हेवाट न लावणारे आघाडीचे राज्य - कर्नाटक १८,९७० किलो प्रतिदिन
सर्वाधिक जैव वैद्यकीय कचरा निर्माण करणारी पाच राज्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश महाराष्ट्र, केरळ, प. बंगाल
निर्माण होणाऱ्या सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावणारे राज्य - महाराष्ट्र
प्रतिदिन देशात निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा - ४,०५,७०२ किलो
प्रक्रिया न होणारा कचरा १,१३,७१९ किलो

विल्हेवाटीची पद्धत
सध्या शहरात जैव वैद्यकीय कचरा उचलून तो नष्ट करण्याची पद्धत केंद्राच्या निकषानुसार आहे. हीच पद्धत इतर राज्यांत अवलंबली जाते. केंद्राने बारकोड पद्धत अलीकडे सक्तीची केली असली, तरी येथे काही वर्षांपासून अवलंबली जात आहे.

कचऱ्याचे आव्हान
1) जैव वैद्यकीय कचऱ्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. तसेच जनावरे, कोंबड्यांसारखे पक्षी कचऱ्याच्या संपर्कात आल्यास, त्यांच्या पोटात कचरा गेल्यास अशावेळी संबंधित जनावर, पक्ष्याचे मांस आणि संबंधित जनावरांच्या दुधातूनही मानवी आरोग्याला धोका होऊ शकतो.

2) रोगराईस कारणीभूत ठरणाऱ्या या कचऱ्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. अतिशय धोकादायक, रोगराई पसरविणारा आणि मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा हा कचरा असतो. त्यामुळे या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्‍यक असते. 

3) थेरगाव आणि बीआरटी नंबर सोळा येथे जैव वैद्यकीय कचरा रस्त्यावर इतर कचऱ्यात आढळला. यावरून संबंधित डॉक्‍टरांचा शोध घेऊन आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई केली; मात्र अनेक ठिकाणी रस्त्यावर इतर कचऱ्यासोबत जैव वैद्यकीय कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

4) बेजबाबदार वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर लक्ष ठेवून हा धोकादायक कचरा पूर्णतः उचलणे हे एक आव्हान आहे.

5) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाने क्‍लिनिक, हॉस्पिटल, पॅथॉलॉजी लॅब आणि कचरा विल्हेवाट लावणाऱ्या कंपनीवर योग्य नियंत्रण ठेवावे व वरचेवर या यंत्रणेचे तटस्थ परीक्षण व्हावे.

प्रशासनाची बाजू...
डॉ. अनिलकुमार रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी 
महापालिका जैव वैद्यकीय कचरा हा आरोग्यास अतिशय धोकादायक आहे. रस्त्यावर असा कचरा टाकणे हा गुन्हा आहे. असे कोणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. 

एस. व्ही. चेण्णाल, आरोग्य निरीक्षक 
जैव वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकण्याच्या काही घटना घडल्या आहेत. संबंधित डॉक्‍टरांना नोटीस देऊन प्रत्येकी तीन हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढे लक्ष ठेवून अधिक कडक कारवाई करण्यात येईल.
 

मयूर घुले, पास्को, प्रशासनप्रमुख 
निकषानुसार संकलित केलेल्या सर्व जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट ‘पास्को’कडून लावली जाते. २७५ ठिकाणांवरून वेळापत्रकानुसार तीन वाहनांतून आम्ही हा कचरा संकलित करतो. कोणी हा कचरा रस्त्यावर टाकत असेल, तर त्यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. ते पालिकेचे काम आहे. 
 

डॉ. प्रमोद कुबडे, संचालक, स्टार हॉस्पिटल
असे प्रकार कोणी करत असल्यास ते निंदनीय आहे. रोगराई आणि आरोग्याचा प्रश्‍न निर्माण करणारा हा कचरा संबंधितांकडून वेळीच आणि योग्य पद्धतीने विलग करून घ्यावा. सर्व डॉक्‍टरांनी सामाजिक भान ठेवून जबाबदारीने याबाबत काळजी घेतली, तर आपल्या शहराच्या आरोग्याला हातभार लागेल.

डॉक्‍टरांची बाजू...
वैद्यकीय कचरा उचलण्यासाठी वाहन क्‍लिनिकपर्यंत येत नाही. मोठ्या हॉस्पिटल व क्‍लिनिकबाबत हा भेदभाव होतो. यासाठी पैसे भरतो; पण त्याच्या आकारणीबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. या संबंधी असणाऱ्या पालिकेच्या कमिटीवर डॉक्‍टरांना प्रतिनिधित्व नाही. ‘निमा’ या संघटनेने डॉक्‍टरांचा प्रतिनिधी या कमिटीवर घेण्याची मागणी पूर्वी आयुक्तांकडे केलेली आहे.

तीन बंद वाहनांमधून शहरातील २७५ ठिकाणांवरून हा कचरा यशवंतराव चव्हाण रुग्णालयात ‘पास्को’च्या प्रक्रिया केंद्रावर (इनसिनेटर) आणला जातो. हा कचरा चार वर्गवारीत बंद पिशव्या आणि बॉक्‍समध्ये बारकोड लावून संकलित केला जातो. रक्ताशी संबंध आलेला कचरा आठशे अंश 
तापमानाला बंदिस्त इनसिनेटरमध्ये जाळला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com