अंतर्गत भागातही हवी बससेवा

निगडी बस स्थानक - पीएमपी बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची धावपळ.
निगडी बस स्थानक - पीएमपी बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची धावपळ.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून पुण्याच्या विविध भागात ये-जा करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची (पीएमपीएमएल) बससेवा असली, तर शहरांतर्गत प्रवासासाठी अपेक्षेएवढ्या गाड्या नाहीत. वाढती लोकसंख्या, विस्तारलेले शहर लक्षात घेऊन नवीन मार्गाची आखणी अपेक्षित आहे. लगतची गावे, नवीन औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक संकुलांकडे जाण्यासाठी बससेवा असावी अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. गेल्या दहा वर्षांत ५१७ कोटी रुपये खर्च केल्यानंतर आणि आणखीही रक्कम देण्याची तयारी असताना, पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष करू नये, ही येथील लोकप्रतिनिधींची मागणी. या संदर्भात वस्तुस्थिती मांडणारी वृत्तमालिका आजपासून.

पिंपरी - पीएमटी आणि पीसीएमसीटी या पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या परिवहन सेवांचे दहा वर्षांपूर्वी विलीनीकरण करून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) कंपनी स्थापन केली. दोन्ही शहरांतील वेगवेगळ्या भागात ये-जा करण्यासाठी जादा सुविधा मिळाल्या. मात्र, त्या प्रमाणात पिंपरी-चिंचवडच्या शहरांतर्गत बससेवेत वाढ झालेली नाही. तोटा होत असल्याच्या कारणाने काही मार्ग बंद झाले, तर मार्ग सुसूत्रीकरणाच्या पद्धतीत काही फेऱ्या कमी झाल्या. गेल्या दहा वर्षांत विविध भागातील वाढलेली लोकसंख्या, शहराचा विस्तारलेला भाग यांना जोडणारी अंतर्गत बससेवा वाढविण्याची आवश्‍यकता आहे.

महापालिकेकडून पीएमपी महामंडळाला संचलनातील तूट, बस खरेदी, विद्यार्थी-अंध- अपंग मोफत पास, कामगारांच्या वेतनातील फरक अशा विविध बाबींसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले जातात. गेल्या आर्थिक वर्षांत ५५ कोटी रुपये दिले. राहिलेले साडेपाच कोटी रुपये देण्यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव आल्यावर, त्यांनी तो थांबविला. ‘येथील प्रवाशांचे, लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घ्या’, ही त्यांची मागणी. पिंपरी-चिंचवडमध्ये किती गाड्या वाढविल्या, प्रवासी आणि उत्पन्न किती वाढले, याची आकडेवारी देत प्रशासनाने त्यांची बाजू मांडली. या गोष्टी वादाच्या दिशेने न जाता संवादाच्या दिशेने गेल्या पाहिजेत, ही सर्वसामान्यांची अपेक्षा.
महामंडळ स्थापन होण्यापूर्वी पीएमटी आणि पीसीएमटीमध्ये वाद होते. एकमेकांच्या हद्दीत विस्तार करण्याला ते परवानगी देत नव्हते. त्यामुळे, पुणे-मुंबई रस्त्याने पुणे महापालिका आणि पुणे रेल्वेस्थानक येथील बसस्थानकापर्यंतच पीसीएमटीला जाता येत होते. 

महामंडळ झाल्यानंतर दोन्ही शहरांना विविध रस्त्यांनी जोडणारे बसमार्ग सुरू झाले. त्याचा फायदा प्रवाशांना झाला. मात्र, सर्वांना पिंपरी-चिंचवड परिसरातून केवळ पुण्यातच जायचे नसते. पीसीएमटी असताना शहरांतर्गत बसमार्गाचा विस्तार होत असे. नगरसेवक, पीसीएमटीचे सभासद आग्रहाने बससेवा आपापल्या भागात सुरू करीत. आता ते सर्व संपले आहे. गेल्या दहा वर्षांत लोकसंख्या दीडपटीपेक्षा जास्त वाढली. नव्या इमारती झाल्या. दुसऱ्या बाजूला पीएमपीएमएलची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. तिकिटांचे दर वाढले. नवीन बसखरेदी थांबली. त्यामुळे शहरांतर्गत प्रवासासाठी सार्वजनिक बससेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

शहरांतर्गत काही प्रभागांत बससेवाच नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. शहरातील या भागातून त्या भागात जाण्यासाठी स्वस्त आणि जास्त फेऱ्या असलेली बससेवा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. दोन्ही महापालिकांचा आर्थिक निधी घेऊन महामंडळाची स्थापना झाल्याने, शहरांतर्गत बससेवा वाढविण्याची जबाबदारी पीएमपीएमएलचीच आहे. त्यामुळे प्रवाशांचे म्हणणे, मागण्या समजून त्यानुसार आखणी करण्याकडे महामंडळाने लक्ष दिले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com