म्हाडा कॉलनी-मोरवाडीतील बसशेड गायब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

पिंपरी - पिंपरी गावातील स्वच्छतागृहांपाठोपाठ आता म्हाडा कॉलनी - मोरवाडी मार्गावरील एका टोलेजंग व्यापारी इमारतीशेजारील बसथांब्याचे शेड रात्रीतून गायब झाले. सकाळपासून थांबा जागेवर नसल्याने दिवसभर प्रवाशांकडून त्याची शोधाशोध सुरू होती. गेल्या काही महिन्यात महापालिकेच्या ‘प्रॉपर्टी’वर डल्ला मारण्याचे प्रकार सुरू असताना, महापालिका मात्र ‘मूग गिळून गप्प बसली’ असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दुसरीकडे बसथांबे पळवून नेण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

मासुळकर कॉलनी - अजमेरा कॉलनी मार्गावरून मोरवाडीकडे येताना म्हाडा कॉलनी -मोरवाडी कॉर्नरवर उजव्या बाजूस गेली अनेक वर्षे हा थांबा प्रवाशांना सेवा देत होता. तसेच या थांब्यावरील जाहिरातींमधूनही पीएमपीला दरवर्षी चांगले उत्पन्न मिळत होते. असा उपयोगी बसथांबा अचानक पळवून नेल्याच्या प्रकारामागील गौडबंगाल काय? याची चर्चा प्रवाशांत होती. बस थांबा शेड नसले, तरी नेहमीप्रमाणे पीएमपीएमएल बस त्या ठिकाणी थांबत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. बसथांबा हलविण्यासंदर्भात कोणाची तक्रार अर्ज नसल्याचे समजते; परंतु याठिकाणी बसथांबा हटवून एक नवीन हॉटेल थाटल्याचे दिसते. कारण, मॉल, व्यावसायिक कार्यालये, दुकाने यांच्या समोरील बसथांबे गायब होण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. तसेच, काही दिवसापूर्वी नेहरूनगरमधील स्वच्छतागृहदेखील अशाच प्रकारे राजकारणी मंडळीच्या आशीर्वादाने गायब झाले आहे. याच प्रकारातून ‘त्या’ नव्या हॉटेलसाठी म्हाडा कॉलनी - मोरवाडी कॉर्नरवरील बस थांबा गायब केल्याचे नागरिकांमध्ये चर्चा रंगलेली आहे. मात्र, अशा प्रकारांकडे महापालिकेने नेहमीप्रमाणे डोळेझाकपणा केल्याचे दिसते.

दोन लाख रुपयांचा थांबा 
पिंपरी- चिंचवड शहरात लाखो रुपये खर्च करून ठिकठिकाणी आधुनिक सुसज्ज स्टीलचे बस थांबा शेड उभारले आहेत. एका स्टील थांब्याची किंमत सुमारे सव्वादोन लाख रुपये आहे. एका प्रभागातील एकेका नगरसेवकाला दोन थांबे शेड उभारण्याची परवानगी आहे. त्यानुसार शहरात २५६ बस थांबे उभारले आहे. म्हाडा कॉलनी- मोरवाडी मार्गावर उजव्या बाजूला एकही बस थांबा सद्य:स्थितीत नाही, परंतु डाव्या बाजूला गरज नसताना काही अंतरावरच दोन नवे बस थांबा शेड उभारलेली आहेत.

नागरिकांची गैरसोय होईल, असे काही आम्ही करणार नाही. बस थांबा काढण्याविषयी माझी कोणतीही मागणी नव्हती. महापालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा करतो.
- केशव घोळवे, नगरसेवक  

गरज नसल्याने या प्रभागातील काही नगरसेवकांनी बस थांबा काढण्याची मागणी केली होती. त्यामुळे महापालिकेने तो काढून जमा केला आहे.
- बी. एम. शेटे, कनिष्ठ अभियंता महापालिका