वाहतूक पोलिसांना मिळणार क्रेन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील ‘सर्व्हिस रोड बनलाय वाहनतळ’ या बातमीची दखल महापालिकेने घेतली आहे. दापोडी ते निगडी या मार्गावर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना दोन क्रेन दिल्या जाणार असल्याचे शहर सहअभियंता प्रवीण तुपे यांनी सांगितले.

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील ‘सर्व्हिस रोड बनलाय वाहनतळ’ या बातमीची दखल महापालिकेने घेतली आहे. दापोडी ते निगडी या मार्गावर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना दोन क्रेन दिल्या जाणार असल्याचे शहर सहअभियंता प्रवीण तुपे यांनी सांगितले.

दापोडी ते निगडीदरम्यानचा बीआरटी मार्ग सुरू झालेला नसल्याने पीएमपी बस सेवा रस्त्याने जातात; मात्र या मार्गावर अनेक जण वाहने उभी करत असल्याने कोंडी होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये एक जुलैला वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेऊन शहर सहअभियंता प्रवीण तुपे यांनी सांगितले, की दापोडी-निगडीदरम्यान बीआरटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दापोडी ते पिंपरीदरम्यान मेट्रोचे काम सध्या सुरू आहे. यामुळे अनेक वाहनचालकांनी सेवा रस्त्याचा वापर सुरू केला आहे; मात्र या रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांकडे पुरेशा क्रेन नाहीत. त्यामुळे पालिका पोलिसांना क्रेन देणार आहे. याबाबत लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाईल.’’

ग्रेड सेपरेटरवरील कारवाई थंडावली
पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेड सेपरेटर रस्त्यावर व्यावसायिक वाहने उभी केल्यास दंड आकारण्याचे अधिकार पालिकेने वाहतूक पोलिसांना दिले होते. त्यानुसार दंड आकारण्यास सुरवातही झाली होती; मात्र कालांतराने ती थंडावली आहे. 

पदपथांबाबत पुणे पॅटर्न हवा
पदपथावर उभ्या वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार पुणे पालिकेने वाहतूक पोलिसांना दिले आहेत. अशा वाहनचालकांकडून हजार रुपये दंड आकारला जात आहे. असे अधिकार पिंपरी-चिंचवड महापालिकेने द्यावेत, अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे.