राष्ट्रवादीचा आज ‘एल्गार’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

पिंपरी - केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप सत्तेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. याअंतर्गत शनिवारी (ता. ७) पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: रस्त्यावर उतरणार असून, त्यासाठी पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मोर्चासाठी भव्य रथ तयार करण्यात आला आहे. या रथात गाढ झोपी गेलेल्या कुंभकर्णाचा प्रतीकात्मक पुतळा असणार आहे. शिवाय भाजीपाला घेऊन काही बैलगाड्याही सवाद्य सहभागी होणार आहेत. वाढती महागाई, नोटाबंदी, जीएसटी यासारख्या निर्णयांमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या किमतींचा भडका उडाला आहे. या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्‍नांबरोबर राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुंबई ते नागपूर समृद्धी मार्ग, सणासुदीच्या तोंडावर जीवनावश्‍यक वस्तूंची टंचाई व भाववाढ इत्यादी राज्य सरकारशी संबंधित प्रश्‍न आणि स्थानिक पातळीवरील निगडी-कात्रज मेट्रो सुरू करणे, अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न, आंद्रा तसेच भामा आसखेड धरणातून पाणी मिळविणे, बंदिस्त जलवाहिनी योजना, राष्ट्रवादीच्या काळात भूमिपूजन झालेल्या व मंजूर झालेल्या पण रखडलेल्या योजना इत्यादी महत्त्वाच्या प्रश्‍नांवर आंदोलन होणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, मंगला कदम, भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, नीलेश डोके, आजी-माजी नगरसेवक, विशाल वाकडकर, वैशाली काळभोर, सुनील गव्हाणे सहभागी होणार आहेत.

असा असेल मोर्चाचा मार्ग
मोर्चा दुपारी ३ वाजता पंचपीर चौक-काळेवाडी येथून सुरू होईल. तेथून पिंपरी पूल, सेवा विकास बॅंक, जमतानी चौक, जायका चौक, साई चौक, शगून चौक, मुख्य बाजारपेठ, भाटनगर, इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पूल, गोकूळ हॉटेलमार्गे पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यावर मोर्चाचा समारोप होईल.